तिसर्‍या पत्नीचा पैशांसाठी छळ करणार्‍याविरूध्द गुन्हा, शिरूर तालुक्यातील घटना

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – तीन बायका फजिती ऐका ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. यालाच शोभेल असा एक प्रकार शिरुर तालुक्यात घडला आहे. पाच वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने त्याने दुसरे लग्न केलं. दुसऱ्या पत्नीचा छळ करत तिला माहेरी जायला भाग पाडलं. त्यानंतर तिसऱ्या महिलेशी सुत जुळवत एकत्र राहू लागला. मात्र, हे करताना अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

शिरुर तालुक्यातील करंदी येथील नराधमाविरोधात शिक्रापूर पोलिसांनी तक्रारदार पत्नी जयश्री नप्ते हिच्या तक्रारीवरुन पैशांसाठी छळाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान प्रशांतची पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीच्या मृत्यूच्या तपासाची संपूर्ण माहिती शिक्रापूर पोलिस मागवित असून प्रशांत नप्ते याचेसह त्याचे आई-वडील, बहीण व  दाजी यांना लवकर अटक करणार असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी जयश्री यांचे प्रशांत नप्ते यांचेशी लग्न जानेवारी २०१५ मध्ये झाले. लग्नाच्या पहिल्या महिन्यानंतर लगेच सासू शारदा, सासरा कैलास यांनी छळ करायला सुरवात केली व घरातील खाण्यापिण्याचे पदार्थही ते लपवून ठेवू लागले. पती प्रशांत व सासरे कैलास यांनी तर दारु पिऊन माहेरुन पैसे आणावेत म्हणून शिवीगाळ-दमदाटी सुरू केली. दरम्यान प्रशांतच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुलांना घेवून जयश्री व प्रशांत हे चौघे भोसरी (पुणे) येथे रहायला गेल्यावर तिथे नणंद पल्लवी जितेंद्र हरगुडे व नंदावा जितेंद्र हरगुडे (रा.आंबेगाव खुर्द) हे दोघे येवू लागले व त्यांनीही शिवीगाळ, मारहाण करुन छळ करायला सुरवात केली.

साधारण एक वर्षानंतर पहिल्या पत्नीची दोन मुले यांना जयश्री पासून दूर ठेऊन पती, सासू-सासरे व नणंद-नंदावा यांनी सर्वांनी एकत्रितपणे अधिक छळ करायला सुरवात केली व लग्नात काहीच दिले नाही म्हणून भांडी व पैसे मागायला सुरवात केली. याच दरम्यान लग्नात माहेरकडून आलेले सर्व दागिने प्रशांत यांनी मोडून टाकून जयश्री हिचा छळ वाढविला. या सर्वांना कंटाळून जयश्री माहेरी आल्यावर प्रशांत यांनी स्नेहल गोकुळे नामक एका अपत्यासह असलेल्या महिलेला पत्नीसारखे घरी ठेवून घेतले.

या सर्व लेखी तक्रारीच्या अनुषंगाने व कौटुंबीक वादाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिसांच्या भरोसा सेल मध्ये फौजदार जयश्री कुटे (रांजणगाव पोलिस स्टेशन) यांनी प्रशांत व जयश्री यांचा संसार पुन्हा सुरळीत होण्यासाठीचे प्रयत्न केले. मात्र जयश्री नप्ते यांच्या ठाम भूमिकेने सदर फिर्याद दाखल झाली असून पाचही आरोपींना लवकर अटक करणार असल्याची माहिती तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी दिली. प्रशांत नप्ते याची पहिली पत्नी प्रज्ञा नप्ते हीचा अपघाती मृत्यू सन २०१४ मध्ये झाला. सदर मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी करण्याची मागणी जयश्री नप्ते यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली. त्यानुसार दिवंगत प्रज्ञा नप्ते यांच्या अपघाती संशयास्पद मृत्यूची आणि त्याच्या तपासाची सर्व माहिती आम्ही मागवित असल्याचे तपास अधिकारी आदीनाथ शिंदे यांनी सांगितले.