शिक्रापूरात भैरवनाथ मंदिरातील दानपेटीची चोरी

शिक्रापूर – शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी लहानमोठ्या चोऱ्याच्या घटना घडत असताना आता शिक्रापूर येथील कोयाळी पुनर्वसन गावठाण मधील भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील कोयाळी पुनर्वसन गावठाण भैरवनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष कांताराम गिलबिले हे दररोज मंदिराची पूजा करून दरवाजाला कुलूप लावत असतात, नेहमीप्रमाणे गिलबिले हे सात नोव्हेंबर रोजी सकाळी पूजा करून मंदिर दरवाजाला कुलूप लावून घरी गेले, आज आठ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास गिलबिले हे मंदिरात गेले असताना त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले, यावेळी मंदिराच्या आतमध्ये जाऊन पाहणी केली असता मंदिरातील दानपेटी नसल्याचे आढळून आले, यावेळी आजूबाजूला पाहणी केली असता, मंदिराच्या समोर लोखंडी गज मिळून आले, त्यामुळे लोखंडी गजाने कुलूप तोडून दानपेटी चोरी गेल्याचे लक्षात आल्याने, याबाबत कोयाळी पुनर्वसन गावठाण भैरवनाथ मंदिर कमिटीचे अध्यक्ष कांताराम गणपत गिलबिले रा. कोयाळी पुनर्वसन शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच…….

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या होत असून प्रत्येक दिवशी चोरी होताच आहे, तर काही ठिकाणच्या चोऱ्यांचे गुन्हे दाखल देखील झालेले नाही, मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरट्यांनी त्यांना पकडण्याचे पोलिसांना आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे.