भुमीगत विद्युत लाइन स्थलांतर न करताच होतय रस्ताचे काम

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे नगर महामार्गाचे वाघोली ते शिक्रापुर पर्यंत सहापदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरु आहे. परंतु हे काम करत असताना भविष्याच्या दुष्टिने काही गोष्टींचा विचार होणे आवश्यक असताना तो झालेला दिसत नाही. सध्या वाघोली पासून लोणीकंद पर्यत दोन्ही साईटने रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पंरतु हे काम करत असताना वाघोलीकरांच्या जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा अशा विजेच्या बाबत गांभीर्यतेने घेतलेले दिसत नाही.

या मध्ये वाघोली (खांदवेनगर)पासून लोणीकंद (आळंदी फाटा) पर्यत महावितरणच्या भूमिगत असलेल्या 22 केव्हीच्या केबल (‘वाघेश्वर फिडर व पूर्वरंग फिडर )’स्थलांतरित न करता त्यावर रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे. तर तुटलेल्या व खराब झालेल्या जागी तेथेच डागडुजी करण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात या विद्युत केबल (वाहिनी) खराब झाल्या किंवा त्या केबलचा मेंटेनन्स निघाल्यास महामार्ग खोदणार का ? अशा सवाल वाघोलीतील सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. तर रस्त्याच्या कडेला असलेले विद्युत खांब देखील रस्त्याच्या एकदम कडेलाच शिफ्ट केले जात आहेत. तुटलेल्या केबल, डीपी बाॕक्स या मध्ये देखील डागडुजी करुन पूर्ववत करताना दिसत आहे.त्यामुळे फक्त कागदोपञी आणि दिखाऊ काम सुरु असल्याचा देखील आरोप होत आहे. विशेष म्हणजे लाइटचे काम होत असताना महावितरणच्या देखरेखे खाली काम होणे गरजेनुसार असताना ते ही होताना दिसत नाही.

याबाबत खाजगीत नाव न छापण्याच्याअटिवर काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महावितरण’ने कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. तर प्राथमिक माहिती नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा सोडून विद्युत वाहिनीची नवीन केबल रोड लगत स्थलांतरित करण्यासाठी आदेश असतानाही महावितरण विभाग याकडे लक्ष देत नाही.

तर संबंधित काम महावितरणने दिलेल्या अंदाजपत्रका पेक्षा पस्तीस टक्के वाढीव दराने दिल्याबाबत देखील जोरदार चर्चा सुरु आहे.तर हे काम करताना स्थानिक रोड लगतच्या बाधित शेतकऱ्यांना कोणताही प्रकारचा मोबदला दिला गेला नसल्याने बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही जागा मालक व शेतकऱ्यांनी याबाबतीत आंदोलनही करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता (पुर्व विभाग )मिलिंद बारभाई, तसेच महावितरणचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता (ग्रामीण ) बुंदेला आणि हडपसर विभागाचे उपकार्यकारी अधिकारी अमित भरते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होउ शकला नाही.

२२ केवीची विद्युत वाहिनी जर रस्त्यामध्ये गाडून टाकली आणि भविष्यात केबलचे मेंटेनन्स किंवा स्थलांतरित करण्यासाठी पुन्हा लाखो रुपये खर्च येणार असेल तर हे काम आत्ताच व्यवस्थित का केले जात नाही ? जनतेच्या कर रूपातील पैशाचा सर्व संबंधित अधिकारी टक्केवारीच्या नावाखाली लूट करत आहेत. हे काम व्यवस्थित केले नाही तर महावितरणच्या कार्यालयासमोर जण आंदोलन उभारण्यात येणार आहे. तर या कामामध्ये संगणमंताने मोठा भ्रष्टाचार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.
सर्जेराव वाघमारे (पंचायत समिती सदस्य हवेली).

महामार्गाचे काम करत असताना प्रथम वाघोली साठी असलेल्या केबल शिफ्ट किंवा नवीन केबलचे काम प्रथम होणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात बिघाड झाल्यास वाघोलीला अंधारात राहवे लागेल, कोट्यावधी रुपये खर्च करुन तयार केलेला रोड देखील खोदावा लागेल. त्यामुळे भविष्यकाळातील अडचणीचा विचार करुन काम होणे गरजेचे आहे.याबाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लवकरच पञव्यवहार करणार आहे…
संदिप सातप (भाजपा सरचिटणीस)