न्हावरा येथे महिलेचा विनयभंग करून डोळे निकामे करणारा जेरबंद, शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

शिक्रापूर, पोलीसनामा ऑनलाइन ( सचिन धुमाळ ) – शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला शौचास गेली असताना महिलेची छेडछाड करून तिला मारहाण करत दोन्ही डोळे निकामे केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. महिलेची छेडछाड करून तिचे डोळे निकामे करणाऱ्यास जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शिक्रापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

न्हावरा (ता.शिरूर) येथे ३ नाेव्हेंबर रोजी न्हावरा येथील महिला सायंकाळच्या सुमारास शौचास गेली असताना अचानक त्या ठिकाणी एक इसम आला आणि त्याने महिलेस मारहाण करत तिच्या डोळ्यांवर प्रहार करून दोन्ही डोळे निकामे केले होते. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असताना याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांसह आदींना या गुन्ह्यातील तपासाबाबत सूचना केल्या होत्या.

यावेळी पीडित महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर गुन्ह्यातील इसम हा अनोळखी फाटका तोंडाला लाल रंगाचा कपडा बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक राजू मोमीन यांना माहिती मिळाली की, सदर महिला सांगत असलेल्या व्यक्तीचे वर्णन हे एका चायनीज सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी मिळत असून, सध्या तो इसम कोठेतरी निघून गेला आहे. त्यानंतर सदर व्यक्तीचा तपास पोलीस पथके करत असताना सदर संशयित इसम हा रागीट स्वभावाचा असून, नेहमी दारूच्या नशेत असतो. भगव्या रंगाची मफलर वापरतो, नेहमी कोणाशीही वाद घालतो, त्याच्याजवळ एक पिंड असून त्यावर नागाच्या फण्याचा आकार आहे, भीक मागतो, मुका असल्याचे ढोंग करतो अशी माहिती मिळाली.

सदर व्यक्तीचे नाव हे कुंडलिक साहेबराव बगाटे (रा. उंडवडे सुपे, ता. बारामती, जि. पुणे) असे असल्याचे समजले, त्यानंतर सदर व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सात पथके तयार केली होती. प्रत्येक गावात सदर व्यक्तीची माहिती देण्याचे काम तसेच ग्रामीण सुरक्षा यंत्रणेद्वारे माहिती प्रसारित करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, पोलीस नाईक हरीश शितोळे हे शिक्रापूर-चाकण चौकात आले असताना त्यांना सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी मिळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, तो दारूच्याच नशेत होता. यावेळी पोलिसांनी त्याला जेरबंद करून शिरूर पोलिसांच्या स्वाधीन केले.