डिझेल चोरून घेवून जाणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात, चोरटे मात्र फरार

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीसह पुणे नगर महामार्गावर अनेक दिवसांपासून डीझेल चोरीच्या घटना घडत असताना शिक्रापूर परिसरात डीझेल चोरी करून घेऊन जाणारा ट्रक शिक्रापूर पोलिसांना पाठलाग करून पकडण्यात यश आले असून माञ ट्रकमधील आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शिक्रापूर येथील कासारी फाटा येथील एका पेट्रोल पंपामध्ये लावलेल्या ट्रकमधील डीझेल चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या असताना ज्या वाहनातील डीझेल चोरीला गेले त्या वाहन मालकाने पेट्रोलपंपातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याला सीसीटीव्हीमध्ये एक दहा टायर असलेल्या ट्रकमधून आलेल्या व्यक्तींनी डीझेल चोरी केले असल्याचे निदर्शनास आले होते, यावेळी ट्रकमालकाने सदर सीसीटीव्हीचे रेकॉर्ड करून ठेवलेले होते, तर शनिवारी रात्री शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, गोरक्ष भामगर, अमित देशमुख हे कोरेगाव भीमा नजीक रात्रगस्त करत असताना त्यांना एक संशयित ट्रक वेगाने येत असताना दिसला. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रकचालक वेगाने ट्रक घेऊन पळून गेला मात्र यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरु केला असता ट्रक मधील दोघेजण लोणीकंद हद्दीमध्ये ट्रक सोडून पळून गेले यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता ट्रकमध्ये डीझेलचोरी करण्यासाठी ठेवलेले क्यान आढळून आले, त्यांनतर कासारी फाटा येथून ज्या व्यक्तीच्या ट्रक मधील डीझेल चोरीला गेले होते ते त्या ट्रकचे मालक आदेश धायरकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे जप्त केलेल्या ट्रकची पाहणी केली असता त्यांच्या ट्रकचे डीझेल चोरी करून घेऊन जाणाऱ्या ट्रकचे सीसीटीव्ही तपासले असता चोरी करून जाणाराच ट्रक शिक्रापूर पोलिसांनी पकडला असल्याचे समोर आले, याबाबत आदेश अशोक धायरकर रा. शिक्रापूर चोवीसवा मैल ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.