तमिळनाडू येथे झालेल्या बालविवाहचा शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली फिर्याद तर TN पोलिस करणार तपास

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – तामिळनाडू राज्यात एका अल्पवयीन युवतीचा तिच्या आईने युवतीच्या मामाशी विवाह केल्याची घटना घडली, मात्र सदर पिडीत युवती हि तळेगाव ढमढेरे येथे वास्तव्यास असल्याने युवतीच्या सतर्कतेने या घटनेला वाचा फुटली असून आता पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे युवतीची आई शशिकला सेलवन व युवतीचा पती झालेला मामा शामसुंदर जर्ज या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील विशालविश्व सोसायटीमध्ये सदर पिडीत अल्पवयीन युवती राहत असताना तिला तिच्या पतीकडून त्रास होत असल्याबाबत तिने तक्रार दिली होती, दरम्यान पिडीत युवती माहेर संस्थेमध्ये वास्तव्यास होती, या काळामध्ये एका अल्पवयीन युवतीचा विवाह करण्यात आलेला असून याबाबत आपण गुन्हे दाखल करावेत असे आदेश पंचायत समिती शिरूर कडून तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांना देण्यात आले होते.

यावेळी खेडकर यांनी माहेर संस्थेमध्ये जात चौकशी केली असता पिडीत युवतीच्या आईने पिडीत युवतीचे वय सतरा वर्षे असतानाच युवतीच्या मामाशी ऑक्टोबर २०१० मध्ये तामिळनाडू येथील एस. एस. मांगेपूरम जि. तूतुकुडी येथील मावशीच्या घरी जबरदस्तीने विवाह करून दिला असल्याचे समोर आले, याबाबत आता तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी संजय खेडकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पिडीत युवतीची आई शशिकला सेलवन व युवतीचा पती झालेला मामा शामसुंदर जर्ज दोघे रा. करंबविल्हई ता. चीरतंदूर जि. तूतुकुडी राज्य तामिळनाडू यांच्या विरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून सदर गुन्हा पुढील तपासासाठी पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाच्या वतीने तामिळनाडू राज्याच्या तूतुकुडी पोलिसांकडे रवाना करण्यात आला आहे.