पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shikrapur Pune Rural Police | शिक्रापूर येथील तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिचा मोबाईल चोरुन नेणार्या चोरटे हे अहिल्यानगरचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी खराडी येथून मोटारसायकल चोरली़ ती चोरुन नेत असताना वाटेत त्यांनी शिक्रापूर येथे मोबाईल चोरल्याचे उघड झाले आहे. (Arrest In Robbery Case)
गणेश कैलास भोसले (वय १८, रा. मावळेवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), अजय माणिक घेगडे (रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) व त्यांच्या एका साथीदाराने केल्याने निष्पन्न झाले आहे.
पायल संतोष लोहार ही तरुणी वडिलांचा डब्बा घेऊन पायोनेर कंपनीकडे रोडने पायी जात होती. शिक्रापूर येथील हॉटेल भाऊचा धक्का येथे तिच्यामागून एक जण आला व त्याने तिच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केला. तेव्हा त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून तो पळून जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलवरील दोघांबरोबर बसून पळून गेला. शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास केला जात होता. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेतली असता हा गुन्हा आरोपी गणेश भोसले व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. गणेश भोसले याला पकडून चौकशी केल्यावर त्याने खराडीतून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. चोरलेला मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली आहे.