शिक्रापुर : नेत्यांच्या श्रेयवादात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल

शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्ये सध्या लसीकरणावरून सुरू असलेला वाद नागरिकांच्या आणि रुग्णांच्या जीवाशी खेळला जावू लागला आहे. वाघोली मधील भारतीय जैन संघटनेच्या सकुंलनात सुरु असलेल्या लसीकरण केंद्राचे ठिकाण नागरिकांना न सांगता एका राञीत बदलून ते वाघोली मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.यामुळे अनेकांना माहिती नसल्यामुळे लसीकरण घेणासाठी आलेल्या वयोवृद्ध व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले.

वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी जागा (रुम) अपुरी पडू लागली . प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेस्टहाउस मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. येथे दोन खोल्या आहेत. लसीकरण स्टाफला बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. लसीकरणानंतर नागरिकांना डॉक्टर यांच्या निगराणी खाली बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. गेस्ट हाऊस समोर वैटिंग करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडत आहे. समोर छोटा मांडव टाकण्यात आला आहे. परंतु अपुऱ्या जागेमुळे काही नागरिक भर उन्हात उभे होते. बसण्यासाठी पुरेशी जागाही नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात चार चाकी येण्यासाठी पुरेसा रस्ताही नाही. यामुळे वृद्ध व्यक्तीला महामार्गावरून चालत आणण्याची कसरत करावी लागणार आहे. पार्किंग साठी जागा नसल्याने भर पुणे नगर महामार्गावर वाहने पार्किंग करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार आहे.

या सर्व अडचणी असताना देखील आरोग्य विभागाने हे लसीकरण केंद्र का हलवले हे मुळी कोणाला कळले नाही ? भारतीय जैन संघटनेच्या सकुंलनात भरपूर जागा, लसीकरणाची वेगळी खोली, लसीकरणानंतर बसण्यासाठी स्वतंत्र हॉल, डॉक्टर व स्टाफ साठी स्वतंत्र रूम, साहित्यासाठी स्वतंत्र रूम, पार्किंग साठी भरपूर जागा अशी सुविधा असतानाही हे केंद्र केवळ लोकप्रतिनिधिच्या श्रेयवादातून हलविण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेच्या नेत्याने नियम डावलत सोसायटी मध्ये लसीकरण केल्याच्या प्रकारणानंतर हा वाद सुरू झाला. याच वादातून राष्ट्रवादीकडून हे केंद्र हलविण्यात आल्याचे बोलले जात आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येतात.आता लसीकरण केंद्र देखील येथे असल्यामुळे गर्दीत वाढ होणार आहे. आणि त्याच्या प्रत्यय देखील पहिल्या दिवशीच आला.येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चिञ पाहयला मिळाले .आता येथे येणारे रुग्ण व लसीकरणासाठी आलेले नागरिक यांच्यात संपर्क येण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्ण पॉझिटिव्हीटी दर वाढू शकतो. याला जबाबदार कोण ? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

आपल्या नेत्याच्या पुढेमागे करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हा वाद जाणीवपूर्वक लावल्याची वाघोली परिसरात दबक्या आवाजात चर्चा आहे तर काही विघ्नसंतोषी लोकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही पक्षाला बदनाम करत चांगले चाललेल्या कामात अडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.