शिक्रापुर : विहरित बुडून 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील विहरित पडून एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला असून अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक लोकांच्या आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने त्या मुलाचा मृत्यदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अवघा 11 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार काल दि. 14 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास यश सुंदर कनकुटे (वय 11) मूळ गाव परळी, सध्या रा. वाडेगाव ता शिरुर, जि. पुणे हा आपल्या दोन मित्रा सोबत वाडा गाव शेजारील एका कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीवर मासे पकडायला गेला होता. तेव्हा त्याच्या सोबत असणारा मुलगा व यश दोघे ही पाण्यात घसरून पडले. त्यातील एक मुलाला रोशन रमेश भंडारे याने प्रयत्न करून कसा बसा पाण्याबाहेर काढला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने यश पाण्यात बुडाला. याबाबतीत घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक व सहा.पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात,सचिन मोरे यांनी देखील त्या मुलाचा सायंकाळी शोध घेतला परंतु अंधार झाल्याने मुलगा सापडला नाही.

अखेर आज दि. 15 रोजी सकाळी कोरेगाव भीमा येथील बाबू भोकरे, स्वप्नील भोकरे यांच्या सोबत अग्निशमन दलाच्या जवानांनी यश याचा मृतदेह गळाच्या सहाय्याने पाण्याबरोबर काढण्यात यश आले .यावेळी अग्निशमन दलाचे सुजित पाटील प्रमुख स्टेशन ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार इंगवले, चेतन खमसे, ओमकार पाटील, प्रसाद जीवडे, किशोर काळभोर, पंकज माळी यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. तसेच या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सचिन मोरे, प्रदीप दरेकर, दादासाहेब गव्हाणे आदींनी प्रयत्न केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.