शिक्रापूर : कोविड सेंटर मधुन पळालेल्या आरोपीला शोधण्यासाठी ड्रोन व श्वानचा वापर

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक खळबळजनक प्रकार २०२० मधील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असताना त्याला येरावडा कारागृहात दाखल करण्यापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्याला कोविड सेंटर मध्ये दाखल केलेले असताना त्या ठिकाणहून आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळ काढला.
यानंतर सुरू झाली शिक्रापूर पोलिसांची धावपळ यामध्ये आरोपीला पकडण्यासाठी शिक्रापूर पोलिसांना श्वान आणि ड्रोन चा वापर करत अखेर सहा तासानंतर यश आले. सौरभ उर्फ सौऱ्या ड्रायवऱ्या भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहें.

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या वाजेवाडी येथे २०२० मध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेला सौरभ उर्फ सौऱ्या भोसले याला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने ९ मे रोजी अटक केले होते त्याला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याची रवानगी येरावडा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत केली होती, मात्र न्यायालयाच्या नियमानुसार पोलिसांनी सदर आरोपीची कोरोना चाचणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आल्याने त्याला कोंढापुरी येथील शासकीय कोविड सेंटर मध्ये दाखल करण्यात आलेले होते, मात्र २१ मे रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मिलिंद देवरे, लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड शुभम निर्मळ, विजय पोकळे हे कोंढापुरी येथील शासकीय कोविड सेंटर या ठिकाणी बंदोबस्त करत असताना दुपारी एकच्या सुमारास चोरीतील आरोपी असलेला सौरभ उर्फ सौऱ्या भोसले हा पोलिसांच्या हाताला हिसका देऊन भिंतीवरून उडी मारून पळून गेला होता, याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, विक्रम साळुंके यांसह आदींनी कोंढापुरी येथे धाव घेत होमगार्ड व ग्रामस्थांच्या मदतीने कोविड सेंटरच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतात व इतरत्र श्वान पथक व ड्रोनच्या शोध मोहीम सुरु केली, दरम्यान श्वानने पाच किलोमीटर पर्यंत पाठलाग करुन पाठलाग बंद केला याच वेळी सदर आरोपी तळेगाव ढमढेरे येथे पळाला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जात श्वानाच्या मदतीने शोध घेतला असता सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सदर पाळलेला आरोपी उसाच्या शेतात मिळून आला, यावेळी पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई मिलिंद दिलीप देवरे वय ३३ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांनी सौरभ उर्फ सौऱ्या ड्रायवऱ्या भोसले वय २१ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हावलदार काशिनाथ गरुड हे करत आहे.