वाघोली : स्ट्रीट लाईटचे काम करत असताना नियमांची पायमल्ली !

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली ता. हवेली येथे पुणे – नगर महामार्गावर लाखो रुपये खर्च करून गेल्या काही महिन्यापुर्वी स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम करण्यात आले होते. माञ ही स्ट्रीट लाईट चालु न झाल्याने “लाखोच्या दिव्या खाली अंधार” या आशयाची बातमी प्रकाशित होताच संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारावर जागा आली आणि विद्युत केबल अंडरग्राउंड करण्याचे काम सुरू झाले परंतु हे काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घालून दिलेल्या नियमावलीचे पूर्णपणे उल्लंघन करत दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

काम सुरू असताना सुरक्षेच्यादृष्टीने कुठल्याही प्रकारची उपायोजना यावेळी करण्यात आलेली नाही. रस्तावरच खोदकामासाठी वापरण्यात आलेले टॕक्टर उभे करण्यात आले आहे . काम सुरू असताना बॅरिकेट उभे करणे, लाल झेंडे लावणे, ब्लींकर लावणे इ सह योग्य खबरदारी घेणे गरजेचे असताना कुठल्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. यामुळे अचानक पणे एखाद्या मोठा अपघात होऊ शकतो. याबाबत संबंधित ठेकेदाराची बोलण्याचा प्रयत्न केला असता हे काम स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपणास बातमी लावायची असेल तर लावू शकता असे देखील सांगितले. त्यामुळे अशाप्रकारे कामे कोणाच्या आशीर्वादाने चालतात हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ह्या कामासाठी शर्ती व अटी घालत परवानगी देण्यात आली आहे परंतु यातील शर्ती व अटिचे पालन होत आहे कि नाही हे पाहण्याची तसदी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घेत नाहीत. फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम सार्वजनिक विभाग करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे .

याबाबात अशी देखील प्राथमिक माहिती आहे की महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने स्टिट्र लाइटचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तर रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान ह्या स्टिट्र लाइट काढल्या देखील जावू शकतात असे एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटिवर सांगितले. त्यामुळे एकूणच सुरु असलेल्या स्टिट्र लाइटच्या कामाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की सर्वच गोष्टीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही परवानगी दिली आहे पण नियमांचे पालन जबाबदारी करण्याची त्यांची आहे.

तर हे काम नक्की कोणाचे ?
पुणे – नगर महामार्गावरील दुभाजगावर वाघोली हद्दीत अंदाजे ८६ लाख रुपये खर्च करुन स्टिट्र लाइट बसवण्याचे काम सुरु आहे. माञ या कामासाठी निधी नक्की कोणाचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे .कारण यासाठी स्थानिक लोकप्रतिधी, ग्रामपंचायत आणि पीएमआरडीए याकडून निधी मिळाल्याबाबत चर्चा आहे.