शिक्रापूरचे लॉकडाऊन पहिल्याच दिवशी गुंढाळले

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत असलेल्या संख्येमुळे शिक्रापूर येथील काही पदाधिकारी आणि मोजक्या व्यापाऱ्यांनी बैठक घेत शिक्रापूर पुढील चौदा दिवस बंद ठेवून लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाचे प्रांताधिकाऱ्यांनी खंडन केले असून शिक्रापूर पुन्हा सुरु राहणार असून काही काळ बंद राहणार असल्याने शिक्रापूरचे लॉकडाऊन एकाच दिवसात गुंढाळले गेले आहे.

शिक्रापूर गाव चौदा दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी काही मोजक्या व्यापारी आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला होता, त्यांनतर बंद बाबतचे ग्रामपंचायतचे एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले, याबाबत गावातील काही व्यक्तींनी सदर निर्णय चुकीचे असल्याचे सांगत याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याकडे गाव बंद ठेवण्याचा निर्णय चुकीचा असून गाव सुरु करण्याबाबत पाठपुरावा केला होता, त्यांनतर आज शिक्रापूर येथे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, सरपंच हेमलता राऊत यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, यावेळी माजी सरपंच रामभाऊ सासवडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजिनाथ काशिद, आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे, तलाठी अविनाश जाधव, ज्ञानेश्वर भराटे, माजी सरपंच अंजना भुजबळ, जयश्री भुजबळ, माजी उपसरपंच आबाराजे मांढरे, सुजाता खैरे, नवनाथ सासवडे, निलेश थोरात, भगवान वाबळे, ग्रामपंचायत सदस्य गिता चव्हाण, मिना सोंडे, जयश्री दोरगे, रोहिणी गिलबिले, संतोष भुजबळ, गौरव करंजे, सोमनाथ भुजबळ, मयूर करंजे, रमेश थोरात, संजय भांबूर्डेकर, अंकुश घारे यांसह आदी उपस्थित होते, यावेळी ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेत ग्रामपंचायतने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले, तर सर्व ग्रामस्थांच्या चर्चेतून सर्व व्यावसायिक पूर्वीच्या बंद मुळे अडचणीत आलेले असून व्यापाऱ्यांना आधार देण्यासाठी सर्व दुकाने चालू राहणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

ग्रामस्थांनी दुपार नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत सर्व दैनंदिन व्यवहार सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला, असून नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे, यावेळी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गावामध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करून त्याद्वारे नियंत्रण ठेवण्याचे आदेश देखील दिले आहे. तर यावेळी ग्रामपंचायत सरपंच यांनी विश्वासात न घेता, मोजक्या व्यापाऱ्यांना हाताशी धरून, सर्व व्यापाऱ्यांची बाजू ऐकून न घेता अचानकपणे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी विना गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला योग्य समज देण्याची मागणी आठ ग्रामपंचायत सदस्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.