शिर्डीतील भगवीकरणाच्या कारस्थानावर अखेर पडदा

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – साईसंस्थानने अलिकडच्या काळात मंदिर परिसरातील फलक भगवे केले. साईसमाधी शताब्दीनिमित्त उभारण्यात आलेल्या स्तंभावर त्रिशूळ व ओमची चिन्हे टाकली. तसेच फलकावर द्वारकामाई मज्जीदचा उल्लेख मंदिर असा केला या मुद्द्यावरून शिर्डीत गेले दोन दिवस चर्चा होती. अखेर गेल्या दोन दिवसांपासून साईसंस्थानातील भगवीकरणाच्या सुरू असलेल्या वादावर सामोपचाराने एकमुखी निर्णय घेवून शिर्डीकरांनी या वादावर पडदा टाकला आहे.

या सगळ्या घडामोडीत साईबाबांची प्रतिमा मलीन होत आहे. चर्चेला जाणिवपूर्वक वेगळ वळण दिले जात असल्याने डॉ. एकनाथ गोंदकर यांच्या पुढाकारातून सर्वपक्षीय ग्रामस्थांनी या विषयावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. गोंदकर यांनी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्थांशी याबाबत बोलून एक – दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे व वाद संपवण्याचे आश्वासन साईसंस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिल्याने यावर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. गोंदकर यांनी सागितले.

सर्वांनी एकत्र येवून माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. यापुढे शिर्डी ग्रामस्थांची एक कमिटी करून या कमिटीशी चर्चा करूनच शिर्डीसंबंधी महत्त्वाचे निर्णय साईसंस्थान घेणार असल्याचे आश्वासन हावरे यांनी आपल्याला दिल्याचेही डॉ. गोंदकर यांनी सांगितले. यावेळी कैलासबापू कोते, सुजीत गोंदकर, शिवाजी गोंदकर, राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर, विजय कोते, सचिन तांबे, नितीन उत्तम कोते, निलेश कोते, सचिन शिंदे, जमादार इनामदार, गोपी परदेशी, रवींद्र कोते, बाबासाहेब कोते, गणेश जाधव आदीं उपस्थित होते.