प्रेमसंबंधातून झालेल्या ‘चिमुकली’ला साई दरबारी सोडून केला ‘पोबारा’ ; मातृप्रेमापोटी पुन्हा परतली आई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दोन दिवसापूर्वी सहा महिन्याच्या मुलीला साई दरबारी सोडून गेलेली तिची आई मातृप्रेमापोटी पुन्हा तिला बघायला साई दरबारी परत आली. मात्र तिने मुलीला नेण्यास नकार दिला आहे. प्रेमसंबंधातून ही मुलगी झाल्याने आईने नेण्यास नकार दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील पारोळ तालुक्यातील या मातेचा एरंडोल तालुक्यातील एका गावातील तरुणाशी विवाह झाला होता. या दोघांना एक सात वर्षाची आणखी एक मुलगी आहे. दरम्यान पतीशी वाद झाल्याने ही महिला मामाकडे राहू लागली. मामा या महिलेचे दुसरे लग्न लावून देणार होता. दरम्यानच्या काळात या महिलेचे एकाशी प्रेमसंबध जुळले. त्यातून तिला एक मुलगी झाली. प्रियकर विवाहित असल्याने तो महिलेला, तसेच मुलीला घरात घेईना. पती महिलेला घरात घ्यायला तयार झाला पण मुलीचा स्वीकार करत नव्हता. या पेचातून मार्ग काढण्यासाठी, आपल्या सुखातील अडसर दूर करण्यासाठी या महिलेने या सहा महिन्यांच्या चिमुकलीला ३१ मे रोजी सकाळी थेट साईदरबारी सोडून पोबारा केला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी मुलीला साई दरबारी सोडून गेलेली आई मुलीला बघण्यासाठी तडक साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कार्यालयात येऊन धडकली. सुरक्षा रक्षकांनी तिची रवानगी पोलिसांकडे केली. पोलिसांनी त्या लहानगीची रवानगी नगरच्या चाईल्ड होममध्ये केली आहे.

त्या महिलेने पोलिसांशी बोलताना मुलीला परत नेण्याची तयारी दर्शवली आहे. पोलीस तिच्या सांगण्यातील व नात्याची सत्यता पडताळून पाहत आहेत. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करू, असे पेलिसांच्यावतीने सांगण्यात आले.