शिर्डी साईबाबा संस्थानकडून पत्रकारावर FIR दाखल

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी साईबाबा संस्थानाकडून प्रसारमाध्यमांना सूड भावनेची वर्तवणूक दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरात भाविकांची प्रतिक्रिया घेताना गर्दी केल्याचे कारण सांगत एका वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकावर गुन्हा नोंद करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करत हा गुन्हा नोंद केल्याची माहिती मिळत आहे.

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर (१६ नोव्हेंबर २०२०) नियम अटींसह राज्यातील मंदिरे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. तेव्हा केलेल्या वृत्तांकनाबाबत शिर्डी संस्थांकडून तब्बल अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल केला गेला. यासाठी साईबाबा संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे यांनी फिर्याद दिली असून, भादंवी कलम ३५३, १८८, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, शिर्डी संस्थान आणि गावकरी असा वाद सुरु असतानाच संस्थानकडून वृत्तनिवेदकावर गुन्हा दाखल केल्याने, करण्यात आलेली कारवाई सूद बुद्धीने केल्याची चर्चा रंगली आहे.

गावकरी विरुद्ध मुख्यधिकारी संघर्ष
प्रसारमाध्यमानंतर साईबाबा संस्थानाने शिर्डीच्या ग्रामस्थांसाठी नियमावली बनवण्याचा घाट घातला आहे. या आचारसंहितेवर उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब झाले तर शिर्डीच्या ग्रामस्थांना जाचक अटींचा सामान करावा लागण्याची शक्यता आहे. शिर्डी मंदिराचे मुख्य अधिकारी यांच्या या भूमिकेविरुद्ध ग्रामस्थ विरुद्ध अधिकारी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

ग्रामस्थांनी संस्थांनकडे केलेल्या मागण्यांना मुख्यअधिकारी के. एच. बगाटे यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी मुख्यअधिकारी बगाटे यांच्याशी चर्चा केली. मात्र, आता संस्थांनाने गावकऱ्यांसाठी आचारसंहिता तयार केली असून, ही नियमावली उच्च न्यायालयात सादर केल्याची बाब समोर येत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शिर्डी संस्थान अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शिर्डीतील काही प्रमुख ग्रामस्थांनी आज बैठक घेतली आणि याविरोधात लढा उभारण्याचा निर्धार केला आहे.