‘राजीव गांधी मॉब लिंचर’ ; भाजप मित्रपक्ष प्रवक्त्याच्या वक्तव्याने खळबळ

चंदीगड : वृत्तसंस्था – ‘मिस्टर क्लीनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून संपल्याचे’ विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपच्या मित्रपक्षाच्या प्रवक्त्याने देखील राजीव गांधी यांच्यावर टीका केली आहे. ‘राजीव गांधी मॉब लिंचर’ असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

शिरोमणी दलाचे प्रवक्ते मंजींदर सिंह सिरसा यांनी रविवारी ‘राजीव गांधी भारताचे सर्वात मोठे मॉब लिंचर होते. ज्यांनी एका समाजविरोधात मॉब लिंचिंगची योजना बनवली होती’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र मोठा वाद निर्माण झाला आहे. खरेतर त्यांच्या या विधानाचा सरळ सरळ संदर्भ शीख दंगलीशी आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी बोफर्स घोटाळ्याचा संदर्भ लावत राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर 1 म्हटले होते.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी

‘तुमच्या वडिलांची प्रतिमा तुमच्या ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन अशी रंगवली होती. पण त्यांच्या आयुष्याची अखेर ‘भ्रष्टाचारी नंबर १’ च्या रुपात झाली. नामदार, हा अहंकार तुम्हाला खाऊन टाकेल. हा देश चुका माफ करतो, पण फसवेगिरी कधीही माफ करत नाही. १९८० मध्ये राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काळात बोफर्स घोटाळा झाला. त्यानंतर काँग्रेसला सत्तेत येणं देखील कठिण झालं होतं. देशाच्या विकासात व्यक्ती म्हणून गांधी घराणं कोणतंही योगदान देत नसल्याचही मोदी म्हणाले होते

राहुल गांधींचे प्रत्युत्तर

मोदींनी प्रतापगड आणि बस्ती येथील जाहीरसभांमध्ये राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. परंतु मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून संपला. त्याला प्रत्युत्तर देत राहुल गांधींनी मोदींवर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘मोदी जी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतेय. तुमची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही.’