शिरूर : आरोग्य सुविधेवरुन आजी-माजी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

शिक्रापुर : पुणे जिल्ह्याच्या या सर्वच भागात कोरोना ने थैमान घातले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना बेड न मिळणे व्हेंटिलेटर न मिळणे अशा घटना वारंवार समोर येत असून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आपला आमदार निधी आरोग्य सुविधासाठी वापरला असल्याचे ट्विट मे महिन्यात केले होते.यावेळी आमदार महोदयांनी या ट्विटमध्ये 13 मे रोजी जागतिक परिचारिका दिना निमीत्त आपल्या आमदार निधीतून व्हेंटिलेटर मास्क पिपीई कीट यांचे वाटप करण्यात आल्याचा उल्लेख केला होता,परंतु प्रत्यक्षात हे व्हेंटिलेटर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस उपलब्ध झाले आहेत. मात्र तेही व्हेंटिलेटर अद्यापपर्यंत सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप शिरूर-हवेलीचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केला.

एकीकडे रुग्णांना व्हेंटीलेटर मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत असून दुसरीकडे व्हेंटिलेटर असून ते कार्यान्वित केलं जात नाही.शिरुर ग्रामीण रुग्णालयात जनतेच्या पैशातून खरेदी केलेल्या आरोग्य साधनांचा जर जनतेसाठीच उपयोग होत नसेल तर अशा आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचं करायचं तरी काय असा आरोप भाजपचे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केलाय.
तर शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी हे सर्व आरोप खोडून काढत माझ्यावरील भाजपच्या माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी जे काही आरोप केले आहेत, ते खोटे आहेत.मार्च महिन्यात सरकारने आमदार निधी म्हणून तालुक्यासाठी ५० लक्ष रुपये कोविड-१९ साठी वापरण्यास दिले असता ते आम्ही पीपीई किट,मास्क आणि व्हेंटिलेटर वर खर्च केले.कदाचित व्हेंटिलेटर शासनाला उशिरा मिळाल्याने ते आपल्या ग्रामीण रुग्णालयात उशिरा दाखल झाले असतील.परंतु पुणे जिल्ह्यातील आरोग्यावर खर्च करणारा कदाचित मी एकमेव आमदार असू शकतो.असे आमदार पवार यांनी सांगितले .

माञ या दोन आजी माजी आमदारांच्या आरोप प्रत्यारोपात शिरुर तालुक्यातील रुग्ण भरडला जावू नये रुग्णाला वेळेवर उपचार उपलब्ध ह्यावेत हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा …..