शिरूर : डोक्याला पिस्तूल लावून जीवघेणा हल्ला, 9 जणांवर FIR

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील म्हसे बु. येथे मुरूम चाळून दिला नाही या रागातून डोक्याला रिव्हॉल्वर लावून तिघा जणांना तलवार,गज, काठ्यांनी मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नऊ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रवीण सुरेश मुसळे (वय 24 रा. म्हसे ता. शिरूर )यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून अक्षय वेताळ, विकास जवान वेताळ, गणेश सदाशिव वेताळ, निलेश सदाशिव वेताळ, केतन कैलास वेताळ, मयूर वेताळ, गणेश वेताळचा दाजी नाव माहिती नाही, पप्पू वेताळ, योगेश वसंत वेताळ, प्रदीप अमृत वेताळ (सर्व रा. म्हसे बुद्रुक ता. शिरूर, पुणे.)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती नुसार म्हसे गावच्या हद्दीमध्ये एका दुकानासमोर फिर्यादी थांबले असताना स्विफ्ट कार, पल्सर, बुलेट, करिज्मा या वाहनांमधून वरील आरोपी आले. यातील विकास जवान वेताळ याने पिस्तूल काढून फिर्यादीच्या डोक्याला लावून” तुम्हाला लय माज आला का रात्री मुरूम चाळून दिला नाही तुला ठारच मारतो” असे म्हणून दमदाटी करत हातातील रोडने मारले तसेच अक्षय वेताळ यांनी हातातील तलवारीने डोक्यावर वार केला तर सर्वांनी मिळून हाताने लाथाबुक्क्यांनी दांडक्याने मारहाण केली.

यावेळी फिर्यादी बरोबर असलेले श्रीधर मुसळे, गणेश मुसळे यांनाही लोखंडी रॉड दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादी प्रवीण मुसळे यास गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. प्रवीण मुसळे यांच्या फिर्यादीवरून नऊ जणा विरोधात जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहे.