शिरूर तालुक्यात होतोय ‘कोरोना’चा उद्रेक ! शिक्रापूर, कोरेगाव भीमा पाठोपाठ निमगावला मोठा हादरा !

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील कोरेगाव भिमा मध्ये एकाच कुटूंबातील पाच जणांना तर शिक्रापुर मधील एका कुटूंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झालेली असताना आता निमगाव म्हाळुंगी येथील एकाच कुटूंबातील दहा जणांचा कोरोनाची लागण झाली माहिती समोर आली आहे, दोन दिवसांपूर्वी निमगाव म्हाळुंगी येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.आता त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्याच कुटुंबातील तब्बल दहा जणांचा कोरोनाची लागण झाली असून चौदा जणांपैकी दहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.

निमगाव म्हाळुंगी येथील एका जेष्ठ नागरिकाला सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यावेळी त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसून येत असल्यामुळे त्याला पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याची कोरोना तपासणी केली असता त्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यांनतर ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी व आरोग्य विभागाच्या वतीने सदर इसम राहत असलेला परिसर पूर्णपणे फवारणी करत निर्जंतुकिकरण करत सदर इसमाच्या संपर्कातील चौदा जणांचे स्व्याब तपासणीसाठी घेण्यात आले होते, तर त्या इसमाच्या संपर्कातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आरोग्य विभागाने तपासणी साठी घेतलेल्या चौदा जणांचे कोरोना अहवाल आज प्राप्त झाले असून चौदा पैकी तब्बल एकाच घरातील दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून फक्त चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना काळापासून अद्याप पर्यंत निमगाव म्हाळुंगी गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले नसताना अचानकपणे कोरोनाचा गावामध्ये शिरकाव होऊन एकाच कुटुंबातील अकराजण बाधित झाले असल्यामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. निमगाव म्हाळुंगी येथील एकाच घरातील दहा जण कोरोनाबाधित झाल्याचे समोर येताच आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक राजेश चांदणे यांनी त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी जात पुन्हा परिसर निर्जंतुकिकरण करत सदर व्यक्तींच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु केले आहे.