शिक्रापुर : प्रतिनिधी – शिरुर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील ग्रामपंचायत मध्ये २०१६ ते २०१८ दरम्यान नोकरीला असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने गावातील ग्रामस्थांना शासकीय योजना तसेच पिक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट कागदपत्रे जमा करून तब्बल ६ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी गणेश सुर्यकांत आर्वीकर याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
हिवरे कुंभार ता. शिरूर येथे २०१६ ते २०१८ कालावधीमध्ये हिवरे कुंभार ग्रामपंचायत मध्ये हंगामी कामगार म्हणून नोकरीमध्ये असणारा गणेश आर्वीकर हा ग्रामपंचायतमध्ये नोकरीला असताना गणेश याने हिवरे कुंभार व पिंपळे खालसा गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना कांदा पिक विमा, ऊस पिक विमा तसेच महाराष्ट्र शासन पंतप्रधान कृषी अवजार योजने अंतर्गत अनुदानित ट्रक्टर घेऊन देतो असे सांगून गावातील शेतकऱ्यांना शासकीय योजनेचे बनावट कागदपत्र दाखवून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा करून सदर कागदपत्रे खरी असल्याचे शेतकऱ्यांना भासविले त्यांनतर शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान अथवा योजना प्राप्त झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी गणेश आर्वीकर याचेकडे चौकशी केली असता गणेश आर्वीकर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली असता गणेश याने दाखविलेली बनावट असल्याचे समोर आले, या घटनेमध्ये गणेश आर्वीकर याने हिवरे कुंभार व पिंपळे खालसा गावातील शेतकऱ्यांची तब्बल सहा लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे, याबाबत राजेंद्र संपतराव देशमुख रा. हिवरे कुंभार ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हिवरे कुंभार ग्रामपंचायतचा तत्कालीन कामगार गणेश सुर्यकांत आर्वीकर रा. हिवरे कुंभार ता. शिरूर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करत आहे.