शिरूर : मंडल अधिकारी 15 हजार रूपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शिरूर भागातील एका मंडल अधिकाऱ्यास 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. नुकतीच ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे शिरूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी लाच घेतली आहे.

अमोल निवृत्तीनाथ जाधव (वय 40) असे पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

अमोल हे तहसील कार्यालयात शिरूर तालुक्यातील पाबळ विभागाचे मंडल अधिकारी आहेत. यादरम्यान यातील 25 वर्षीय तक्रारदार यांची वाळू बाबत तक्रार होती. त्यावेळी अमोल यांनी तक्रारदार यांना वाळू चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या संबंधित कारवाई न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी अमोल याना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. पुढील कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.