कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच, शिरूर बाजार समितीचा निर्णय

शिक्रापुर – वृत्त संस्था – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतण्यात आला गेल्या महिन्यात पिंपळे जगताप येथील उपबाजार केंद्रातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण बाजार समितीचे कर्मचारी आपल्या आरोग्याची चिंता व्यक्त करत होते.

दरम्यान पिंपळे जगतापच्या मार्केट यार्डमधील काही अडतदारांना देखील कोरोनाची बाधा झाल्याने अनेक दिवस मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दखल घेत राज्यात प्रथमच या बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा कवच मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या आरोग्य विमा कवचमध्ये समितीचे कायम कर्मचारी सफाई कामगार, हमाल यांचा समावेश आहे त्यांना कोरोनासहीत अपघाताच्या उपचारार्थ प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा कवच देण्यात येणार आहे. दरम्यान हा आरोग्य विमा कवच तात्काळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे उपसभापती विकास शिवले यांनी सांगितले.

यावेळी येत्या काही दिवसांत मुख्य आणि उपबाजारातील संपूर्ण कारभार पारदर्शक आणि विश्वसनीय करण्यासाठी डिजिटल करणार असल्याचे सभापती जांभळकर यांनी सांगितले.