शिरूर, मावळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरूवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरुर लोकसभा  मतदार संघाची निवडणुकीची अधसुचना मंगळवारी (दि.२) प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना २ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज भरता येणार आहे. मावळचे अर्ज आकुर्डी येथील पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयात तर शिरुरचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जाणार आहेत.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार मंगळवार पासून मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असणाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्य़ालयातून अर्ज घेता येतील. हे अर्ज ९ एप्रिलपर्य़ंतच स्विकारले जाणार आहेत. यानंतर येणारे अर्ज स्विकारले जाणार नसून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी १० एप्रिलला होणार आह. तर १२ एप्रिलला अर्ज मागे घेता येणार आहेत.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील रमेश काळे यांच्या दालनात शिरूरच्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील. तर मावळ लोकसभा मतदार संघाचे अर्ज आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या अपर आयुक्त कविता द्विवेदी यांच्या कार्यालयात दाखल करता येणार आहेत.