2 महिन्यानंतर देखील खून अन् अपहरणाचा तपास ‘शून्य’ !

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरे कुंभार या गावामध्ये एका महिलेचा खून करून महिलेचा मृतदेह पोत्यात बांधून विहिरीमध्ये फेकून दिल्याचे २ जून रोजी समोर आले होते तर वढू बुद्रुक ता. शिरूर येथून २९ मे रोजी एका युवकाचे अपहरण झाले असताना याबाबत तिघांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झालेली असताना अपहरण झालेल्या व्यक्तींचा दोन महिने उलटून देखील तपास लागला नाही.

हिवरे कुंभार ता. शिरूर येथील छाया उर्फ शारदा सकट हि ५५ वर्षीय महिला २९ मे रोजी झाडू विकायला गेलेली होती, त्यानंतर सदर महिला घरी न आल्याने तिचा शोध घेतला परंतु महिला मिळून न आल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिला बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली होती, याबाबत तपास सुरु असतानाच १ जून रोजी हिवरे कुंभार नजीक वरुडे गावच्या हद्दीमध्ये सदर महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून विहिरीमध्ये फेकून दिला असल्याचे समोर आले होते, यावेळी सदर महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतून विहिरीमध्ये फेकून दिला असल्याचे समोर आले होते, याबाबत रामदास पोपट सकट रा. माळवाडी कासुर्डी ता. दौंड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला, मात्र खुनाच्या घटनेला दोन महिने उलटून देखील अद्याप पर्यंत कोणताही तपास लागलेला नसून आरोपी अटक झालेले नाही, तसेच वढू बुद्रुक ता. शिरूर येथून २९ मे रोजी गजानन ज्ञानोबा घारे हा व्यक्ती बेपत्ता झाला होता, त्यानंतर २ जून रोजी छाया बाळासाहेब लोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी गजानन घारे याचे अपहरण केल्या प्रकरणी भोंदू अजित पांडूरंग शितोळे ( महाराज ) रा. न्हावी सांडस ता. हवेली जि. पुणे, ईश्वर शिवाजी ढगे, रोहिदास राघुजी गायकवाड दोघे रा. आपटी ता. शिरूर जि. पुणे या तिघांवर अपहरण व आदी गुन्हे दाखल करत तिघांना अटक केले होते, यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह इतरांकडे चौकशी केली असताना महाराज म्हणून घेणाऱ्या अजित शितोळे यांनी बेपत्ता गजानन घारे याचे कडून अंगामध्ये दैवी शक्ती असल्याचे सांगून अंधश्रद्धा पसरवित बेपत्ता घारे कडून तब्बल पंचवीस लाखाहून अधिक पैसे उकळले असल्याचे समोर आले, तसेच अपहरण झालेल्या व्यक्तीला बेपत्ता झाली त्या दिवशी शितोळे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीमधून एका हॉटेल मध्ये नेल्याचे समोर आले होते, त्यांनतर अपहरण प्रकरणातील तिघांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे, परंतु गजानन घारे याचे अपहरण होऊन दोन महिने उलटले असताना देखील अद्याप पर्यंत त्याचा शोध लागला नाही त्यामुळे सध्याच्या कोरोना काळामध्ये सर्व कामे, उद्योग, व्यवसाय शांत झालेले असताना शिक्रापुरातील अपहरण व खुनाच्या तपासाला देखील कोरोना झाला कि काय असे बोलले जाऊ लागले आहे.

हिवरे कुंभार ता. शिरूर येथे महिलेच्या झालेल्या खुनाबाबत सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांच्याशी संपर्क साधला असतान हिवरे कुंभार येथील महिलेच्या खुनाचा तपास सुरु असून लवकरच खुनाचा छडा लावला जाईल असे विक्रम साळुंके यांनी सांगितले.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथून इसमाचे अपहरण झाल्या बाबतच्या गुन्ह्याच्या सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांच्याशी संपर्क साधला असता गजानन घारे अपहरण प्रकरणाचा तपास दौंड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी सांगितले.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथून इसमाचे अपहरण झाल्याच्या गुन्ह्याच्या सध्या तपास करत असलेल्या वरिष्ठ दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता गजानन घारे अपहरण प्रकरणाचा तपास आमच्याकडे वर्ग करण्यात आलेला असून नियमित व जलद गतीने या अपहरण प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे दौंड उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले.