99 % गुण मिळविणार्‍या ‘त्या’ मुलीचं डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं ‘पालकत्व’

फरिदाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन  –  परिस्थिती हालाकीची असतानाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत 99.60 टक्के गुण मिळवून ऋतुजा प्रकाश आमले हिने यश संपादन केले आहे. ऋतुजा हि बोतार्डेच्या (आमलेवाडी) इथली आहे. परिस्थितीमुळे तिला पुढील शिक्षण घेणे अवघड असल्याने तिचे शैक्षणिक पालकत्व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वीकारलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी या विद्यार्थिनीला डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, असे आश्वासन दिले आहे. तसेच ऑनलाईन शिक्षण घेता यावे, यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ’जगदंब प्रतिष्ठान’तर्फे तिला अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल देखील भेट दिला आहे.

पुणे येथील जुन्नर तालुक्यातील आदिवासी ’पेसा’ क्षेत्रातील आमलेवाडी बोतार्डे इथल्या ऋतुजाने दहावीच्या परीक्षेची तयारी करून 99.99 टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार 99.60 टक्के गुण मिळवून पहिले स्वप्नं पूर्ण केलंय.

गरीब कुटुंबातील ऋतुजाला बळ देण्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. ’जगदंब प्रतिष्ठान’चे सदस्य ऋतुजाच्या घरी पाठवून कार्यकर्त्यांच्या हस्ते ऋतुजाला ऑनलाईन अभ्यासासाठी अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल भेट दिला. तसेच तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारुन मदत करण्याचे आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

याबाबात खासदार डॉ. कोल्हे म्हणतात, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी मेहनतीने शैक्षणिक यश मिळवते. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते, ही कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान आणि समाजासाठी काहीतरी करण्याची मनिषा बाळगणार्‍या ऋतुजाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलंय ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे.