पुणे जिल्हा परिषदेत सलग 52 वर्षे गावडे कुटुंबाची छाप, आता लक्ष्य अध्यक्षपदाकडे

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ५२ वर्षे प्रतिनिधीत्व करण्याचा विक्रम करणा-या माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या कुटुंबाची एकच इच्छा शिल्लक आहे ती म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद. यावेळी योगायोगाने अध्यक्षपदाचे आरक्षण गावडे यांच्या कुटुंबीयांच्या पथ्यावर पडल्याने शिरुर तालुक्याला दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे यांच्या अध्यक्षपदानंतर ३८ वर्षांनी पुन्हा एकदा अध्यक्षपद मिळेल का, याची आता उत्सुकता आहे.

तालुक्याच्या राजकारणात एकमेव सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेले कुटुंब म्हणून माजी आमदार पोपटराव गावडे व त्यांचे कुटुंबीय जिल्ह्यात ओळखले जातात. सन १९६७ ला पहिल्यांदा जिल्हा परिषदेत पोहचलेले पोपटराव गावडे तत्पूर्वी सन १९६२ ला शिरुर पंचायत समितीत पोहचले. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य गणले जात होते. याच पार्श्वभूमीवर १९७२ ते ७९ शिरुर पंचायत समितीत उपसभापती, सन १९७९ ते ९० सभापती, १९९० ते ९५ जिल्हा परिषद सदस्य होताना १९९५ मध्ये गावडे थेट विधानसभेत पोहचले.

त्यानंतर त्यांचे मोठे सुपुत्र सोनभाऊ गावडे जिल्हा परिषदेत पोहचले. ते सलग दोन टर्म सन २००४ पर्यंत. सन २००४ ते २००९ पर्यंत मग मोठ्या सुनबाई सुनिता सोनभाऊ गावडे या जिल्हा परिषदेवर गेल्या आणि तिथे महिला बालकल्याण समितीच्या सभापतीही झाल्या. हे होताना सन २००९ पासून २०१५ या काळात त्या शिरुर पंचायत समितीत पोहचल्या आणि तिथे अडीच वर्षे सभापतीपदी कार्यरत राहिल्या. याच काळात त्यांच्या दूस-या सुनबाई मनिषाताई गावडे शिरुर शहरात एक वर्ष नगराध्यक्षही बनल्या होत्या. शिवाय गावडे यांचे दुसरे चिरंजीव राजेंद्र गावडे यांनाही शिरुर बाजार समितीचे संचालकपद आणि घोडगंगाचे संचालकपदापर्यंत पोहचविण्याठी पोपटराव गावडे यांचे मोठे योगदान आहे.

अर्थात हे सर्व होताना जेष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निष्ठेने काम करणारे नेते म्हणून पोपटराव यांनी आपली ‘इमेज’ जपली असताना त्यांच्या कुटुंबाची एकच इच्छा राहिली आहे ती पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी विराजमान होण्याची. त्यांच्या सुदैवाने आता अध्यक्षपद खुल्या गटातील महिलेसाठी आले असून सुनिता सोनभाऊ गावडे या जिल्हा परिषदेत विद्यमान सदस्या असल्याने यावेळी गावडे कुटुंबाची आणि त्यांना गेली ५० ते ५५ वर्षे मानना-या समर्थक कार्यकर्त्यांची राजकीय इच्छा पूर्ण होणार का, याची उत्सूकता आहे. तसे प्रयत्न गावडे कुटुंबीयांकडून असताना शिरुरला दिवंगत माजी खासदार बापूसाहेब थिटे (सन १९८०-८१) यांच्यानंतर ३८ वर्षांनी शिरूरला अध्यक्षपद मिळणार का, याचीही उत्सूकता तालुक्याला आहे हे नक्की.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/