ग्रामपंचायत निवडणूकीच्या पराभवातुन खुनाचा कट; शिक्रापूर पोलिसांनी 5 जणांना अटक

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या सणसवाडी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून काही युवकांनी एका इसमाच्या खुनाचा कट रचून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असताना शिक्रापूर पोलिसांनी कसोशीने तपास करून खुनाचा कट रचणाऱ्या सह पराभूत महिलेवर देखील गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. अजय श्रीहरी दरेकर, सागर श्रीहरी दरेकर, सुजित हिरामण दरेकर, मृणाल कैलास दरेकर, तुषार ज्ञानेश्वर लांडगे असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून सर्वांना न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सणसवाडी ता. शिरूर येथील अजय दरेकर व सागर दरेकर यांची आई कल्पना दरेकर या ग्रामपंचायत निवडणुकीस उभ्या असताना त्यांच्या विरोधी उमेदवार असलेल्या असलेल्या रवींद्र दरेकर यांच्या वाहिनीने कल्पना दरेकर यांचा पराभव केला होता, त्यांनतर कल्पना दरेकर या महिलेने तिची दोन मुले व त्यांचे तीन साथीदारांना बरोबर घेऊन रवींद्र दरेकर यांच्या खुनाचा कट रचला त्यांनतर अकरा फेब्रुवारी रोजी रवींद्र दरेकर हे त्यांच्या सणसवाडी येथील कार्यालयात असताना अचानक अजय दरेकर, सागर दरेकर, सुजित दरेकर, मृणाल दरेकर, तुषार लांडगे यांसह आदींनी रवींद्र दरेकर याचे कार्यालयात जाऊन रवींद्र यास जीवे मारण्याच्या हेतूने लाकडी दांडके, लोखंडी गज, पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली, सदर मारहाणीमध्ये रवींद्रउर्फ गोपी बबन दरेकर ३४ वर्षे रा. प्रगतीनगर सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे हे जखमी झाले होते याबाबत रामदास बबन दरेकर ३४ वर्षे रा. प्रगतीनगर सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे यांनी प्रथम चंदननगर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने वरील आरोपींवर गुन्हे दाखल करत सदर गुन्हा पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलेला असताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस तपास करत असताना ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव पचनी न पडल्याने पराभूत महिला व तिची दोन मुले आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून खुनाचा कट रचून सर्व प्रकार केल्याचे समोर आले असताना शिक्रापूर पोलिसांनी कल्पना श्रीहरी दरेकर या महिलेवर देखील गुन्हा दाखल केला असून अजय श्रीहरी दरेकर, सागर श्रीहरी दरेकर, सुजित हिरामण दरेकर, मृणाल कैलास दरेकर, तुषार ज्ञानेश्वर लांडगे सर्व रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर हे करत आहे.