शिरूर पोलिसांचा वाळू माफियांना दणका ! तब्बल 17 बोटीवर कारवाई करत 3.26 कोटी रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिरूर पोलिसांनी शिरुर तालुक्याच्या गुणाट येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या १७ बोटींवर कारवाई करत तब्बल ३ कोटी २६ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील गुनाट येथे घोडनदी पात्रात अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुनील मोटे, पवार, पोलिस नाईक उमेश भगत, होमगार्ड या पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकत ८ हायड्रॉलिक बोटी, ४ मोठ्या आकाराच्या बोटी व त्या मध्ये १६ ब्रास वाळू, ५ लहान मोठ्या आकाराच्या बोटी अशा एकूण १७ बोटी किंमत ३कोटी २६ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जागीच नष्ट केला.

या प्रकरणी बोटीचे मालक व चालक अशा नऊ जणांसह इतर १५ ते २० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतीत पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे हे करत आहेत.