शिरूर पोलीस स्टेशनचा प्रश्‍न अखेर मार्गी ! इमारत बांधकामासाठी 1 कोटी 73 लाखांचा निधी मंजूर : आमदार अशोक पवार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले शिरुर पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या बांधकामांसाठी १ कोटी ७३ लाख रुपयाच्या खर्चास प्रशासकिय मान्यता देण्यात आल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन १९-२० करिता मंजुर असलेल्या निधीतुन पोलिस व तुरुंग विभागाच्या आस्थापनामध्ये पायाभुत सुविधा पुरविणे या अंतर्गत १ कोटी ७३ लाख रुपये प्रशासकिय मान्यता मिळाली आहे.

शिरुर पोलिस स्टेशन ची इमारत ही कामकाजाच्या दृष्टीने अपुरी पडत असुन सातत्याने नवी इमारत व्हावी याबाबत मागणी केली जात होती.या ठिकाणी कामकाज करताना पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.या ठिकाणी सध्या लॉकअप रुम, डी. बी रुम, कामकाज कक्ष, ठाणे अंमलदार कक्ष,पोलिस निरीक्षक कक्ष यांद्वारे शिरुर पोलिस स्टेशनचे कामकाज चालते.

शिरुर पोलिस स्टेशनची हद्द मोठी असल्याने तसेच तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असल्याने या ठिकाणी महत्वाचे बंदोबस्त पार पाडले जात असतात. हे सर्व कामकाज पार पाडले जात असताना प्रशस्त इमारत होणे गरजेचे होते. सन २००९-२०१४ या कालावधीत तत्कालीन आमदार अशोक पवार यांनी शिरुर शहराचा चेहरामोहरा बदलत प्रशासकिय इमारत(महसुल),पंचायत समिती कार्यालय या महत्वाच्या इमारती शहरात उभ्या राहिल्या. शिरुर शहराचा विस्तार लक्षात घेता वाढलेला व्याप पाहता पोलिस स्टेशन व शिरुर न्यायालयाची जागा अपुरी पडत होती.

नुकतीच शिरुर न्यायालय इमारतीसाठी ३३ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला. तर शिरुर पोलिस स्टेशन इमारत बांधकामासाठी १ कोटी ७३ लाख रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली असुन या कामी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी विशेष सहकार्य केले असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.