शिरुर तालुक्यात चाललय तरी काय ? ‘महसूल पेक्षा ‘वसुल’वर भर’ असल्याची चर्चा, संबंधित अधिकार्‍यांना ‘नोटीस’

शिक्रापुर पोलीसनामा ऑनलाईन  – शिरुर तालुक्यात महसुलच्या ताब्यातील वाळूच्या गाड्या चोरीला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिरूरच्या पुर्व भागात पकडलेले वाळूची ट्रक व जेसीबी मशीन महसुलच्या कर्मचाऱ्याने सोडून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकीकडे महसुल विभाग कारवाई केल्याचा दिखावू पणा करते तर दुसरीकडे पाठिमागे गाड्या सोडून देण्यात येतात. त्यामुळे शिरुर तालुक्यातील महसूलची अवस्था “कुंपणचं खातंय शेतं” अशी झाली आहे .

मिळालेल्या माहिती नुसार शिरुर तालुक्याच्या पर्व भागातील इनामगाव परीसरामधून मोठ्या प्रमाणावर वाळु वाहतूक होत असून,नागरिकांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नव्हती. मात्र, बुधवारी दुपारी एका तलाठ्याने पकडलेली वाळूची ट्रक मांडवगण फराटा पोलिस चौकीकडे घेऊन जात असताना मध्ये एका अधिकाऱ्यांचा फोन आल्याने गाड्या सोडून दिल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे.यामुळे अधिकारी “महसूल पेक्षा वसुल वर भर “देत असल्याचे बोलले जात आहे.

या बाबत शिरुरच्या तहशिलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की माझ्या कडे तक्रार आली आहे. तलाठी व नायब तहसिलदार यांना याबाबत खुलासा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आले आहे.

तर शिरुरचे प्रांतधिकारी संतोष देशमुख यांनी सांगितले की दोन्हीही प्रकरणी संबधितांना नोटिस बजावण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाइल. तर महसुल मध्ये चाललेला प्रकार गंभीर आहे. यामध्ये अधिकारी देखील सामाविष्ठ असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारांकडे तात्काळ महसुल विभागाच्या चौकशीची मागणी केली आहे.

दोषीवर करण्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत यापुढे कोणत्याही विभागात असे प्रकार खपवून घेतली जाणार नाही. असे शिरुर हवेलीचे आमदार अ‍ॅड .अशोक पवार यांनी “पोलिसनामा” शी बोलताना सांगितले