वारा आणि पावसामुळं शेतातील पिकांचे नुकसान, पंचनामे करून भरपाई द्यावी : संभाजी कर्डिले

शिरूर : शिरूर तालुक्यात सततच्या वादळी वा-यासह पावसाने शेतक-यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले असुन पिकांची पाहणी करून पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शिरूरचे कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी कर्डिले यांनी दिली.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्ष वर्षा काळे,शिवसेनेचे शिरूर आंबेगाव तालुकाध्यक्ष गणेश जामदार,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,मराठा महासंघाचे तालुका सरचिटणीस योगेश महाजन,कार्याध्यक्ष रमेश दसगुडे,प्रा.विलास आंबेकर आदि निवेदन देताना उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेले १५ दिवसांपासून वादळी वा-यासह झालेल्या पावसाने हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून, महसूल व कृषी विभागाच्या अधिका-यांनी पंचनामे करून पंचनाम्यांचे अहवाल शासनानला पाठवून शेतक-यांना मदत जाहिर करावी. दरम्यान पावसाच्या नैसर्गिक संकटाबरोबर कोरोना महामारीमुळेही शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु शेतक-याच्या मदतीच्या मागणीकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.शासनाने शेतक-याच्या मदतीसाठी तातडीने निर्णय घ्यावा. मागील ८ दिवसात तालुक्यात मोठया स्वरूपाचा वादळी वा-यासह पाऊस झाला.या पावसाने शेतातील फळबागांचे व पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी,हुलगा, मटकी, वाल व इतर हाती आलेले पीक जमिन उध्वस्त झाले व त्यामुळे शेतक-यावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढले. यापूर्वीही पिकांच्या नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागत आहे.

त्यामुळे त्वरित पंचनामे करून पंचनाम्यांचा अहवाल पाठवून शासनाकडून मदत जाहीर करावी.सततधार पावसामुळे अनेक गावातील जमिनींना पाझर फुटल्याने पेरणी झालेली पिक सडून गेली.अनेक भागात पाणी साठलेले असल्याने ऊस, मका, कांदा, घास या पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून स्थानिक पातळीवर कृषी आणि महसूल विभागाने एकत्रित पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तातडीन शासनाला पाठवून मदत मिळवून द्यावी.अशी मागणी शिरूरचे कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन केली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष संभाजी कर्डिले यांनी दिली.