शिरूर : श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनावट, खोटे नाव वापरून व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिरुर तालुक्याच्या कारेगाव येथील मेहमुद फारूख शेख याने महेश पाटील नावाने बोगस सर्टीफिकेट घेवून तो महेश पाटील नावाने श्री मोरया नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चालवित असलेबाबतची खबर डॉ. श्री. शितलकुमार राम पाडवी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथे दिली होती.

सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची तात्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करणेकामी मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ. श्री. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग श्री. मिलींद मोहीते यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांना सुचना दिल्या होत्या त्यानुसार स्था.गु.शा. येथील पोलीस उप निरीक्षक श्री. अमोल गोरे, शिवाजी ननवरे, सहा.फौज. शब्बीर पठाण, पो.हवा.निलेश कदम, महेश गायकवाड, दत्तात्रय तांबे, जनार्दन शेळके, पो.ना.विजय कांचन, गुरू जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अजित भुजबळ यांचे पथक तयार करून रवाना केले होते.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने श्री मोरया हॉस्पीटल येथे डॉक्टर व्यवसाय करणारे मेहमुद फारूख शेख(रा. त्रिमुर्ती कॉम्प्लेक्स, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ गाव पिर बुद्हाणनगर, नांदेड, ता.जि. नांदेड) यास ताब्यात घेवून माहीती घेतली असता तो कारेगाव येथे महेश पाटील नावाने वावरत असल्याची तसेच त्याने महेश पाटील, (एम.बी.बी.एस. ) या नावाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून त्या प्रमाणपत्राचे आधारे कारेगाव येथे श्री मोरया हॉस्पीटल नावाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल टाकून त्यात २ वर्षापासून रूग्णांवर उपचार करून रुग्णांची फसवणुक करीत असल्याचे दिसून आले आहे. त्याने महेश पाटील नावाने बनावट आधारकार्ड व शिक्के देखील बनवून घेतले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच त्याने श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चालु करण्याकरीता श्री. शितलकुमार राम पाडवी याचेकडून वेळोवेळी १७,७०,०००/- घेवून त्यांना हॉस्पीटलमधून बाजूला काढून त्यांचीही फसवणुक केली असलेबाबत श्री. शितलकुमार राम पाडवी यांनी रांजणगाव एम. आय. डी.सी. पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे.

सदरबाबत वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र करडे यांनी देखील पडताळणी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथील श्री. सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली चालु आहे.

कारेगाव येथील मोरया हॉस्पीटलच्या बोगस डॉक्टरवर कारवाई करून ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरच्या हॉस्पीटलला तसेच कोवीड सेंटरची परवानगी दिली ,त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा.बोगस डाॕक्टवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे पुणे जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन केली .