राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार शिवसेनेत; शिशिर शिंदेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’?

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार मनसेला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी गेल्या आठड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले असून या वृत्ताला मात्र अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे हे अोळखले जातात. ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या बरोबर शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

मागील वर्षीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले तेव्हापासून शिशिर शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते. शिंदे लवकरच मनसेला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेत प्रवेश करतील असे वृत्तात म्हटले आहे.शिशिर शिंदे यांनी गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, असे म्हटले होते. तेव्हा सुद्धा शिशिर शिंदे मनसे सोडणार अशी चर्चा रंगली होती.