नवाब मलिकांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून शिवप्रेमी संतापले (व्हिडीओ)

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – वारिस पठाण यांच्या विधानावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिवप्रेमींमध्ये या व्हिडिओमुळे संतापाची भावना आहे. असा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदावर राहणं योग्य आहे का ? असा सवाल मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही रायगड किल्ल्यावरील व्हिडिओ मध्ये दिसत आहेत. जेव्हा धनंजय मुंढे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत होते तेंव्हा नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. शिवरायांच्या नावाने सर्व जण जय म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवप्रेमींनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी सर्वजण आनंदाने जय अशी गर्जना करतात. असे आमचे अनेक मुस्लिम बांधव आहेत. मग नवाब मलिक यांना इतकी गुर्मी का ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर अशा प्रवृत्तीची माणसं राहणं तुम्हाला पटत का ?, शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो ? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसला शिव प्रेमींकडून विचारण्यात आले आहे. पण आत्तापर्यंत या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

दरम्यान, मागील महिन्यात नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी मराठी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हयरल झाला होता. यामध्ये विनापरवाना रस्त्याचं काम सुरु केल्याने कामगारांना हात पाय कापून टाकण्याची धमकी कप्तान मलिक यांनी दिली होती. त्यावेळीही नवाब मलिक अडचणीत आले होते.