Video : ‘मामु, शिवभोजन थाळी खानेका है…लेकिन जानेका कैसे?’; पडळकरांनी व्हिडीओ केला शेअर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण यादरम्यान गोरगरीबांची अडचण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारकडून ‘शिवभोजन थाळी’ची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, आता याच शिवभोजन थाळीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ करत प्रश्न उपस्थित केला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार, ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने संचारबदी लागू केली आहे. मात्र, संचारबंदी लागू असताना अनावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यात शिवभोजन थाळी खायची कशी असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ जारी करत उपस्थित केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया…मामु शिवभोजन थाळी खानेका है…लेकिन जानेका कैसे?’ तसेच या व्हिडिओमध्ये अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांकडून कशाप्रकारे कारवाई केली जाते, हेही दाखवले आहे.

दरम्यान, शिवभोजन थाळीवरूनच भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी टीका केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की सध्या शिवभोजन योजना केवळ दिखाऊ ठरत आहे. योजनेतील शिवभोजन लाभार्थींची दरदिवसाची आकडेवारी यादी ही फसवी असल्याने या योजनेची पोल-खोल करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत आहे. जिल्ह्यात बारा केंद्रे सुरू असताना वेंगुर्ले तालुक्यातील शिवभोजन केंद्र हे फक्त चार महिने सुरु होते. गेल्या लॉकडाऊन काळातच ते बंद पडले आहे.