महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार, जेवणाच्या ताटावरून आर्मी जवानांना हाकललं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– महाराष्ट्रासह देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कर्यक्रमाला देश विदेशातील अनेक मान्यवर उपस्थित असून या कार्यक्रमासाठी 12 देशांचे दुतावास हजर राहिले आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कार्यक्रमातही खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या कडून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाही मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात हा सोहळा रंगला असताना अधिकाऱ्यांच्या आरेरावीमुळे शिवजयंतीच्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटचे जवान आले होते. सकाळपासूनच हे जवान महाराष्ट्र सदनात बँडच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्याचे काम करत होते.

मात्र, दुपारी जेवणाच्या वेळी हे जवान कॅन्टीनमध्ये गेले असाना सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना जेवणाच्या ताटावरून बाहेर हकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत एका न्यूज चॅनेलने हे वृत्त दिले आहे. पहाटे सहापासून हे जवान महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. गोरखा रेजिमेंटचे जवान कोणत्याही कार्यक्रमाला जात नाहीत.

हे जवान पहिल्यांदा शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात आले होते. या कॅन्टीनमध्ये बोलवण्यात आले होते. त्यांना जेवणासाठी ताटं वाढून ठेवली होती. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्र प्रशासनाचे अधिकारी विजय कायरकर यांनी तुम्हाला इथ जेवता येणार नाही. तुमची व्यवस्था अन्य ठिकाणी केली आहे असे सांगत जवानांना कॅन्टीनमधून बाहेर काढलं. यामुळे या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.