परदेशातही शिवरायांचा जयजयकार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गडकिल्ल्यांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. मात्र हा शिवजन्मोत्सव सोहळा केवळ राज्य किंवा देशापुरता मर्यादित राहिला नसून जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना दिसत आहेत.

त्यावेळी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील वकिलातीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डेप्युटी काऊन्सूल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिनेट सदस्य केविन थॉमस उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वांनी फेटे बांधून भाषणे दिली आहेत. वकिलातीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी शेकडो भारतीयांनी उपस्थिती लावली होती. सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिनेट सदस्य थॉमस यांनी शिवजयंतीनिमित्त मला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे अशा भावना त्यांनी आपल्या ट्विटवरून व्यक्त केल्या आहेत.

तसेच राज्यसभा खासदार छात्रपती संभाजीराजांनी व्हिडीओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्याआयुष्यातील प्रसंग दाखवणारे छोटे नाटुकलेही सादर करण्यात आले होते. हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये झळकणारा अभिनेता रितेश देशमुख यानेही व्हिडीओ कॉन्फर्नसिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत शिवाजी महाराजांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबरोबर सेल्फी काढण्याचा मोहही नागराज मंजुळेंना आवरला नाही. त्यांनी सोशल मिडियावर हा सेल्फी शेअर केला आहे. परदेशाबरोबरच आज राज्यभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे. तसेच दिल्लीमध्येही मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली आहे.