शिवसैनिक, हिंदुराष्ट्र सेनेने केली पाकिस्तानच्या झेंड्याची होळी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसैनिकांनी दिल्लीगेट येथे पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत तीव्र निषेधही केला. तसेच हिंदुराष्ट्र सेनेनेही पाकिस्तानच्या झेंड्याची होळी केली.
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज दुपारी दिल्लीगेट येथे जमा झाले. त्यांनी तीव्र शब्दांत पाकिस्तानचा निषेध केला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर, पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय जवानांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली.
हिंदु राष्ट्र सेनेचे नेते दिगंबर गेंट्याल यांच्यासह शहरातील कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट येथे दुपारच्या सुमारास पाकिस्तानच्या झेंड्याची होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.