भाजपवर दबाव टाकण्यासाठी सेनेचा ५०-५० फॉर्म्युला?

मुंबई : वृत्तसंस्था – आगामी निवडणूकीत शिवसेनेला बरोबर घेऊनच निवडणूक लवढणार असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले आहे. तसेच युतीसाठी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचेही अमित शहा यांनी सागितले आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात सध्या कोणत्याही नेत्याशी चर्चा सुरुन नसल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेकडून भाजवर दबाव टाकण्यासाठी ५०-५० फॉर्म्युल्यानुसार १४४ जागांची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे.

५ राज्यांत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं बोललं जातं आहे. १४४ जागांची मागणी करून शिवसेना भाजपची कोंडी करण्याच्या पवित्र्यात असल्याचं कळत आहे. तर दुसरीकडे २०१९ मध्ये शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.

एका इंग्रजी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी केलेल्या विधानामुळं महाराष्ट्रातल्या युतीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे. महाराष्ट्रात भाजप-सेनेची युती होणार की नाही, यावरून तर्कवितर्क सुरू असतानाच आता दस्तुरखुद्द अमित शहांनीच युतीचे संकेत दिले. २०१९ ची निवडणूक भाजप शिवसेनेला सोबत घेऊनच लढणार असल्याचा दावा अमित शहा यांनी केला.

अमित शहा युतीसंदर्भात म्हणतात, “२०१९ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबतच असेल. त्यासाठी आमची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, विरोधकांच्या महागठबंधनचा आमच्या विजयावर कोणताही फरक पडणार नाही. तसंच पाच राज्यातील निकालांचाही लोकसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. ”

युतीबाबत अमित शहा आग्रही असले तरी उद्धव ठाकरेंनी युती करणार नसल्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. युतीबद्दल बोलताना शिवेसेना नेते देखील जरा सावध भूमिकाच घेताना दिसत आहेत.

दरम्यान, ‘मिशन महाराष्ट्र’ची निती ठरवण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांसमोबत सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास पावणे दोन तास चर्चा केली. शिवसेनेच्या वाकड्यात न जाता सबुरीनं घेण्याचा सल्ला भाजप अध्यक्षांनी भाजप नेत्यांना दिल्याचं कळतंय.

मध्यप्रदेश, राजस्थानसारख्या मोठ्या राज्यातल्या भाजपच्या पराभवानंतर, युतीसंदर्भात चर्चा करताना शिवसेनेचं पारड जड झालंय हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंची अयोध्यास्वारी असो, किंवा राफेल मुद्यावरून सुरू असलेली टीका, या सगळ्यावर भाजप शिवसेनेवर प्रतिहल्ला करण्याऐवजी मूग गिळून गप्प आहे.

आधी भांडायचं आणि नंतर मांडीला मांडी लावायची अशी शिवसेना-भाजपची राजकीय पंरपराच आहे आणि ती परंपरा २०१९ मध्ये देखील पाहायला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.