गडकरींना ‘मुख्यमंत्री’ बनवण्यासाठी तयारी होती शिवसेना, RSS ची देखील ‘संमती’ पण ‘इथं’ माशी शिंकली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोठ्या महानाट्यानंतर राज्यात अखेर महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र जर भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यात नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री करायला तयार झाले असते तर शिवसेना आपल्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून एक पाऊल मागे येणार होती आणि राज्यात युती सरकार स्थापन होणार होते.

शिवसेनेने हा प्रस्ताव भाजपचे जेपी नड्डा यांच्याकडे पाठवून दिला होता. मात्र भाजपचे केंद्रीय नेतृत्व असे करण्यासाठी तयार नव्हते. परंतु संघाची देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नितीन गडकरी या नावाला पसंती होती. ज्यावेळी शिवसेना अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावर अडून बसलेली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांना समजवण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावर देण्यात आली होती.

नितीन गडकरी यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी जर गडकरी हे मुख्यमंत्री होणार असतील तर आम्ही आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करून युतीमध्ये राहू असे सांगण्यात आले होते. त्यानंतर गडकरींनी नागपूरला जाऊन संघ अध्यक्ष मोहन भागवत यांच्याशी याबाबत चर्चा केली तर ते सुद्द्धा या बदलासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले होते.

नितीन गडकरींनी याला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी ही बाबा जेपी नड्डा यांच्यासमोर मांडली आणि नड्डा यांनी भाजपच्या केंदीय नेतृत्वाला याबाबतची कल्पना दिली. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मात्र आता भाजप शिवसेनेच्या कोणत्याही दबावासमोर झुकणार नसल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी स्वतः प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे सांगितले होते. मात्र शिवसेनेच्या दबावात येऊन भाजपने हा निर्णय घेतला तर चुकीचा संदेश जाईल असे भाजपच्या नेतृत्वाचे म्हणणे होते.

भाजपला असे वाटत होते की शिवसेना जरी काँग्रेससोबत जाऊ इच्छित असली तरी काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून अजित पवार यांच्याशी संपर्क ठेवला होता तर उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या आधीपासून शरद पवारांशी संवाद ठेवला होता. त्यामुळेच शरद पवारांनी देखील सोनिया गांधी यांना मनवण्यात यश मिळवले आहे.

Visit : Policenama.com