शिवसेना उपनेते माजी आ. राठोड यांच्या तडीपार प्रस्तावाची चौकशी पूर्ण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्या तडीपार प्रस्तावाची पोलीस चौकशी पूर्ण झाली असून, पोलिसांनी त्याबाबतचा अहवाल प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे सादर केला आहे. आता त्यावर काय निर्णय होतो, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडासह विविध विषयांवर माजी आमदार राठोड यांनी शहरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला, असा आरोप ठेवत पोलिसांनी अनिल राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. सदर प्रस्तावावर काही त्रुटी असल्याने त्रुटींबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी पोलिसांना दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी सदर त्रुटीबाबत चौकशी केली. आमदार राठोड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले होते. त्याचा जबाब नोंदविण्यात आला होता. चौकशी पूर्ण झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी त्यांचा चौकशी अहवाल प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गाडेकर यांच्याकडे पाठविला आहे.

माजी आमदार राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्तावाबाबत नेमका काय निर्णय घ्यायचा, हे आता प्रांताधिकारी गाडेकर यांच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या निर्णयाकडे नगरकरांची लक्ष लागले आहे.