हिंदुत्वाच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस समोरासमोर; सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यावरून रंगतंय राजकारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे, या मुद्यावरून महाराष्ट्रात राजकारणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे दोन प्रमुख घटक काँग्रेस आणि शिवसेना हे या विषयांवरून समोरासमोर आले आहेत. यावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय युद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना करीत आहे, तर दुसरीकडे या मागणीला काँग्रेस कडाडून विरोध करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकर आणि हिंदुत्वाबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्या सत्ताधारी आघाडीत गदारोळ निर्माण झाला आहे.

हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत काँग्रेसची भूमिका महाआघाडी सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेपेक्षा वेगळी आहे, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी म्हटले आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मुद्दयावर शिवसेनेच्या पाठीशी उभे नाही, असे विधान करून काँग्रेसने हे स्पष्ट केले आहे.

याअगोदर मुख्यमंत्र्यांचे विधान दुर्भाग्यपूर्वक आहे, असे सपाचे अबू आझमी यांनी म्हंटले होते. सरकारमध्ये सामील असलेल्या मुस्लिम मंत्र्यांना त्यांच्यात थोडीशी लाज राहिली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि सरकार सोडावे, असेही अबू आझमी म्हणाले. अबू आझमी पुढे म्हणाले की, सरकार यापुढे धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही आणि युती सरकार चालविण्याच्या अजेंडापासून दूर गेले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार दिली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केल्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे हे विधान समोर आले आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारले की, केंद्रातील सत्ताधारी पक्षाने आतापर्यंत सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मान का दिला नाही?

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल केला होता. ते म्हणाले की, सावरकरांबद्दल पक्षाने आपली भूमिका कधीही बदलली नाही.

हिंदुत्व हा एक मुद्दा आहे, ज्याने महाराष्ट्रातील महाविक्रस आघाडी सरकारमध्ये यापूर्वीच बर्‍याचदा खडाजंगी झाल्या आहेत. वास्तविक, दोन भिन्न वैचारिक पक्षांची युती आहे. एकीकडे हिंदुत्वाच्या नावावर मते गोळा करणारी शिवसेना आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपासारखे पक्ष आहेत ज्यांचे मत भिन्न आहे. अशा परिस्थितीत या पक्षांमधील हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकमत होणे फारच कठीण आहे. अशा परिस्थितीत तीन मुख्य पक्षांच्या या महाविकास आघाडी सरकारमध्ये अशामुळे हादरा बसल्याशिवाय राहणार नसल्याचे चित्र दिसत आहे.