‘हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान’, अग्रलेखातून शिवसेनेचा विरोधकांवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख नेहमीच जाहीरपणे सांगत, देश एक आहे, अखंड आहे. राष्ट्रीय एकात्मता तर आहेच आहे, पण राष्ट्रीय एकात्मतेचे हे तुणतुणे नेहमी मुंबई- महाराष्ट्राच्याच बाबतीत का वाजवले जाते ? हे राष्ट्रीय एकात्मतेचे त्रांगडे इतर राज्यांच्या बाबतीत का लागू होत नाही ? जो उठतोय तो महाराष्ट्राला राष्ट्रीय एकात्मता शिकवतो. ज्या शाहू-फुले-आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला, विषमतेविरोधात लढा दिला त्या डॉ. आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे महाराष्ट्रातील बहुजन समाज उभा राहिला, तो काय एकात्मतेची कबर खणायला ? आम्हाला एकात्मता कोणी शिकवू नये अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर प्रहार केला आहे.

महाराष्ट्र ही संत महात्म्याची, क्रांतिकारकांची भूमी आहे. स्वाभिमान व त्याग हे मुंबईचे दोन तेजस्वी अलंकार आहेत. औरंगजेबाचे थडगे संभाजीनगरात आणि अफझलखानाची कबरही सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणारा हा विशाल हृदयाचा महाराष्ट्र आहे. त्या विशाल हृदयाच्या महाराष्ट्राच्या हाती छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवार दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी दुसऱ्या हाताने स्वाभिमानाचा निखारा ठेवला. त्या निखाऱ्यावर राख साचली आहे, असे कुणास वाटत असेल तर त्यांनी फक्त एक फुंकर मारुन पहावे असा इशाराही शिवसेनेने विरोधकांना दिला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे की नाही, हा वाद ज्यांनी निर्माण केला त्यांनाच तो लखलाभ ठरो. मुंबईच्या वाटेला हे तसे पाचवीलाच पुजलेले आहेत. पण त्या सगळ्या वादमाफियांना भीक न घालता मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून मिरवत आहे.
प्रश्न इतकाच आहे की, कौरव मंडळी भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करताना सर्वच पांडव खाली मान घालून बसले होते. तसे काहीसे यावेळी मुंबईचे वस्त्रहरण सुरु असताना घडलेले दिसत आहे.
मुंबई महाराष्ट्राचीच आहे व रहाणार, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून उतरले. मात्र, डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी कवडीचे देणे-घेणे नसलेले त्यांचे थोतांडी अनुयायी विमानतळावर महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या स्वागतासाठी निळे झेंडे फडकवत हंगामा करतात. हा तर आंबेडकरांचा सगळ्यात मोठा अवमान !
बॉलिवूड नामक हिंदी सिनेसृष्टीचा ‘तंबू’ मुंबईत रुजला व एक उद्योग म्हणून तो फोफावला. या सिनेसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके नामक एका मराठी माणसानेच घातला. त्या वृक्षाची गोड फळे आज मुंबईत सर्वच भाषिक कलाकार खात आहेत.
दादासाहेब फाळक्यांना कधी ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले नाही. पण फाळक्यांनी उभारलेल्या मायानगरीतील अनेकांना ‘भारतरत्न’च काय तर ‘निशाने पाकिस्तान’ पर्यंतचे किताब मिळाले. मुंबईचा फिल्मी उद्योग आज लाखोंना रोजीरोटी देत आहे. सध्या येथे ‘खानावळ’ आहे अशी टीका होते.
घराणेशाहीचे वर्चस्व आज आहेच. तसे तेव्हाही होतेच. कपूर, रोशन, दत्त, शांताराम अशा खानदानांतून पुढची पिढी समोर आली. पण जे उत्तम काम करत होते तेच टिकले. राजेश खन्नाला कोणतेच घराणे नव्हते. जितेंद्र, धमेंद्रलाही नव्हते. पण त्यांच्या मुला-नातवांना ते घराणे असेल तर बोटे का मोडायची ?
घराणी संगीतात आहेत. दिग्दर्शनातसुद्धा आहेत. पण यापैकी प्रत्येकाने मुंबईलाच आपली कर्मभूमी मानली. नव्हे, मुंबईच्या जडणघडणीत योगदान दिले. पाण्यात राहून माशाशी वैर केले नाही किंवा स्वत:च्या काचेच्या घरात राहून दुसऱ्यांच्या घरावर दगड मारले नाहीत. ज्यांनी मारले ते महाराष्ट्राच्या- मुंबईच्या शापाचे धनी ठरले.