दादरमध्ये शिवसेनेने उत्तर भारतीयांना चोपले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दादरमधील प्रभादेवी रस्त्यावर स्टॉल लावून वाहतुकीची अडवणूक करणाऱ्या उत्तर भारतीयांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी मारहाण केली. महाराष्ट्र निवनिर्माण सेनेला टक्कर देण्यासाठी शिवसेनेने हा राडा केल्याचे बोलले जात आहे. मारहाण प्रकरणात शिवसेनेचा प्रभादेवीतील शाखाप्रमुख शैलेश माळी आणि त्यांचा मुलगा मंदार माळीही सहभागी झाला होता. या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्रभादेवीतील उर्वशी बिल्डिंगमध्ये पांडे कुटुंबीय राहते. घरामध्ये विशाल पांडे हा आई आणि तीन भावंडांसह राहतो. आई कायम आजारी असते. घराला हातभार लागावा म्हणून विशालने सिद्धिविनायक मंदिराच्या मागे फ्रँकीचा स्टॉल लावला होता. पण दुसऱ्या दिवशीच काही शिवसैनिकांनी विशालला स्टॉल का लावला, असा जाब विचारण्यास सुरुवात केली आणि त्याचा स्टॉल तोडला. स्टॉलची तोडफोड केल्यानंतर शिवसैनिकांनी विशालला बांबूच्या काठीने मारहाण करत तो राहत असलेल्या बिल्डिंगपर्यंत आणले. जे लोक विशालला वाचवायला पुढे आले. त्यांनाही शिवसैनिक मारहाण करत होते. निखाल पांडे हा विशालचा भाऊ त्याला वाचवायला पुढे आला, तर त्यालाही कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली.

काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी मुंबईला उपाशी ठेवण्याचे केलेले वक्तव्य ताजे असतानाचा हा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात गुजरातमध्ये एका मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून ५० हजार उत्तर भारतीयांना गुजरातबाहेर हाकलून दिले होते. या प्रकरणावरून निरुपम यांनी नागपूरमध्ये बोलताना उत्तर भारतीयांनी ठरवले तर मुंबईला उपाशी ठेवू शकतात, असे वक्तव्य केले होते.
यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी उत्तर भारतीयांना चोप दिला होता. बुधवारी दादरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भररस्त्यात स्टॉल लावत असल्याच्या कारणातून उत्तर भारतीयांना मारहाण केली. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्ही उत्तर भारतीय असल्याने आम्हाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप विशालची बहीण प्रियंका हिने केला आहे. शिवसेना शाखाप्रमुख शैलेश माळी, त्याचा मुलगा मंदार माळी, शेखर भागवत, संतोष म्हात्रे, कैलाश  पाटील, दीपक बोरकर या शिवसैनिकांना आपल्या भावाला मारहाण केली, असाही आरोप प्रियंकाने केला आहे.

जाहिरात