शिवसेनेची Big Offer ! रक्तदान करा अन् मिळवा मोफत एक 1 किलो चिकन, आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात महा रक्तदान शिबीराचे आयोजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात चक्क रक्तदानासाठी प्रलोभन दाखवले जात आहे. प्रत्येक रक्तदात्यास एक किलो चिकन मोफत देण्यात येईल तर शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल, अशी ऑफर देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ माहिम-वरळी विधानसभा क्षेत्रातील राजाभाऊ साळवी मैदान, न्यू प्रभादेवी रोड, मुंबई येथे रविवारी (दि. 13) सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत महा रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. नगरदेवक समाधान सदा सरवणकर हे या रक्तदान शिबीराचे आयोजक आहेत. कोविडच्या या संकटात रक्तदान करू लोकांचे प्राण वाचवू या मथळ्याखाली एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फ्री चिकन ब्लड डोनर’ असं म्हणत प्रत्येक रक्तदात्यास 1 किलो चिकन देण्यात येईल (शाकाहारी रक्तदात्यांना पनीर देण्यात येईल.) अशी ऑफर देण्यात आली आहे. या रक्तदान शिबीरासाठी पूर्व नोंदणी 11 डिसेंबरपूर्वी शिवसेना शाखा 194, सामना प्रेस शेजारी करावी, असे आवाहन केले आहे.

राज्यात फक्त 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा

दरम्यान कोरोना संकटामुळे राज्यातील रुग्णालयात रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्यात 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. राज्यात एकूण 344 रक्तपेढ्या असून त्यात 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आहेत. तर प्लेटलेटच्या 2583 युनिट आहेत. मुंबईत 58 रक्तपेढ्या असून त्यात 3239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत.