शिवसेना-भाजपची विचारधारा एकच असल्याने एकत्र : उद्धव ठाकरे 

गांधीनगर (गुजरात) : वृत्तसंस्था – भाजपा अध्यक्ष आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुजरातमधील गांधीनगरमध्ये हजर राहिले. यावेळी बोलताना त्यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला. तसेच मी मनापासून येथे आलो आहे असं सांगताना अमित शाह यांचा विजय आपली जबाबदारी आहे असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं.

भाजप अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. तत्पूर्वी एका भव्य रोड शो द्वारे गांधीनगरात एनडीए शक्तीप्रदर्शन करणार आहे. तत्पूर्वी झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहांना शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे म्हणाले की , आमच्यामध्ये मतभेद नक्की होतो, मात्र आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मनाने एक झाले आहे, दोन्ही पक्षांच्या विचारधारा एकच असल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. मी येथे कसा काय आलो याचं अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अनेकांच्या पोटात दुखत आहे. आमची विचारधारा एकच आहे. हिंदुत्त्व आपला श्वास आहे आणि तो थांबला तर जगायचं कसं ? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘असं म्हणतात हात मिळाले, पण मने मिळाली नाही तर काय फायदा ? आमची मने जुळली आहेत.

तुमचा नेता कोण ? –
एनडीएविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आमचा नेता एक आहे. गांधीनगरच्या या सभेत सर्वजण ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा देत आहेत. मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांचा नेता कोण आहे, हे त्यांनी सांगावे. दिल मिलेना मिले, हात मिलाओ असे म्हणतात. यांचे हात मिळालेले आहेत, मने मात्र मिळालेली नाहीत अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागली.

अमित शहा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएचे दिग्गज नेते गांधीनगरात दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह राजनाथ सिंग, नितीन गडकरी, प्रकाशसिंग बादल, रामविलास पासवान आदि नेते उपस्थित आहेत.