लोकसभेची रणधुमाळी : अखेर सोमवारी होणार सेना-भाजप युतीची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसापासून शिवसेना भाजप युतीच्या बातम्या सूत्रांकडून सतत येत होत्या. मात्र या सर्व बातम्या शिवसेनेच्या नेत्यांकडून नेहमीच फेटाळून लावल्या जात होत्या. परंतु युतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून उद्या युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची संभाव्यता आहे. सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. उद्या सोमवारी सांयकाळी ६ वाजता अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे बीकेसी एमसीए या ठिकाणी संयुक्त रित्या पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेबरोबर विधानसभेच्या निडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीच्या संदर्भात महत्वाची चर्चा झाली होती. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई हे महत्वाचे नेते देखील बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत शिवसेना भाजपची लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांच्या दृष्टीने अंतिम बोलणी झाली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणूक दोन्ही पक्ष २४-२४ जागांवर लढणार असून विधानसभेच्या निवडणुकीला भाजप १४५ जागी तर शिवसेना १४३ जागी लढणार आहे. हाच अंतिम फॉर्म्युला मागच्या दोन दिवसाखाली पार पडलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अखेर लोकसभेची पालघर जागा शिवसेनेला देण्यास भाजप राजी झाले असून शिवसेनेच्या अन्य मागण्याही भाजपने मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.