तासगावच्या नगराध्यक्षांचे दालन शिवसेनेने फोडले ; पालिका पेटवण्याचा इशारा

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

शिराज्यभिषेकदिनी शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्याने आक्रमक झालेल्या शिवसेनेने नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. तसेच ३० जुन पर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, पालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करून व शिराज्यभिषेक दिनी तासगाव मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नाही म्हणून अखेर बुधवारी तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या.

नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी मात्र नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांना एकट्याला सोडून केबिनला बाहेरून कडी लावून पळ काढला. शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली. मागील 4 दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन केले.

दरम्यान, शिवसेना पालिकेत आल्यानंतर काही नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात होते. वाद सुरू होताच सर्वजण बाहेर आले. त्यातीलच एका नगरसेवकाने बाहेरून सगळ्यांना फोन करून नागराध्यक्षांना मारले, अशी अफवा उठवली, यामुळे शहरात मोठी खळबळ झाली होती तर पालिकेसमोर मोठी गर्दी झाली होती.