अहमदनगर : उप तालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात शिवसेनेचे कोपरगाव उपतालुकाप्रमुखाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. सुरेश शामराव गिरे (वय-44) असे खून करण्यात आलेल्या उपतालुकाप्रमुखाचे नाव आहे.

सुरेश गिरे यांच्यावर चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सुरेश गिरे यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (रविवार) गिरे यांच्या राहत्या घरात घडली. हल्लेखोरांना घरात घुसून गिरे यांच्यावर हल्ला केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गिरे यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही.

हल्लेखोरांनी गिरे यांच्या डोक्यात पिस्तूलामधून तीन गोळ्या झाडल्या. चॉपर, तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गिरे यांचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर तात्काळ त्याच गाडीतून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेतील हल्लेखोरांची संख्या दोन ते तीन असल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती.