हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची ‘कवचकुंडले’ देईल : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या चार वर्षात सतत भाजपवर टीका करून शिवसेनेने लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपशी हातमिळवणी केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात पहिली प्रचारसभा झाली. त्यात मोदींनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून प्रचार केला. त्याला शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल, अशी भूमिका शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रेखातून मांडली आहे. तसंच मोदींच्या सभेला गर्दी नसल्याचे म्हणत विरोधकांनी टीका केली होती. त्यावरही शिवसेनेने विरोधकांची कानउघाडनी केली आहे.

२०१४ साली मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला होता आणि २०१९ सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे. तर पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा पुकार केला आहे. हिंदुत्व राजकारणातून टाळता येणार नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असंही त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

तसंच मोदींच्या सभेला कमी गर्दी झाल्याची टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेनेने ताशेरे ओढले आहेत. मोदी यांच्या सेवाग्राममधील सभेस गर्दी कमी होती. तेव्हा सभेचे मैदान चाळीस टक्के रिकामे होते, अशी काव काव काहींनी केली. पण वर्ध्यातील उष्णतेचा चढलेला पारा पाहता त्या तप्त ज्वाळांतही मैदान साठ टक्के गच्च भरले हे महत्त्वाचे आहे, असं म्हणत विरोधकांना चिमटा काढला. म्हणजे विरोधकांनी ‘गर्दी’चे कारण देत अपशकून करण्याचा प्रयत्न केला, पण ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे या वादासारखाच हा विषय आहे. मैदान चाळीस टक्के रिकामे नव्हते, तर साठ टक्के भरले याचे दुःख विरोधकांना झाले आहे, असंही शिवसेनेनं यात म्हटलं आहे.